बेळगाव लाईव्ह:उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाला (आरसीयु) प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
केंद्र सरकारने देशातील सरकारी तसेच अनुदानित शिक्षण संस्थांचा दर्जा उंचावण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. हा क्षण आरसीयु आणि तिच्या शैक्षणिक समुदायासाठी महत्त्वाचा होता.
पीएम-उषा योजनेचा भाग असलेल्या बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठांतर्गत राणी चन्नम्मा विद्यापीठाला शंभर कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून विद्यापीठातील अध्यापन, संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या उत्कृष्टतेसाठी हा निधी देण्यात आला आहे. अध्यापनाचा दर्जा उंचावणे आणि देशभरातील महाविद्यालये व विद्यापीठांच्या मान्यतेसाठी समर्थन करणे हा प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या पीएम-पुष्पा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सदर योजनेअंतर्गत देशभरातील आरसीयुसह एकूण 78 विद्यापीठांची आर्थिक सहाय्यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी 100 कोटी रुपये बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधनासाठी दिले जाणार असून त्याबरोबरच विद्यापीठांना सशक्त बनवण्यासाठी अतिरिक्त 20 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
एकंदर केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून संयुक्तरित्या प्रगत उच्च शिक्षणाला चालना दिली जाणार आहे. पीएम-उषा योजनेमध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाचा अंतर्भाव व्हावा यासाठी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.