बेळगाव लाईव्ह:पावसा अभावी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात धरणे धरून निदर्शने केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी राजू कागनेकर, मारुती कडेमणी, सुभाष धायगोंडे, चंद्रू राजाई, नामदेव धुडूम आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आपल्या मागण्यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई म्हणाले की, विश्वचेतन प्रा. नंजुडस्वामी यांच्या जयंतीनिमित्त, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज
बेळगाव तालुक्यातील आम्ही शेतकरी येथे जमलो आहोत. पाऊस नसल्यामुळे दुष्काळ पडून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
मात्र सरकारने त्याची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली नाही. शेतकऱ्यांना प्रति एकर 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या भाताच्या वजनामध्ये फसवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही अद्याप कारवाई झालेली नाही. कायद्याच्या चौकटीचे उल्लंघन करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या तलाठ्यांवर देखील कोणतीच कारवाई झालेली नाही. तेंव्हा त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जावी, अशा मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. तलाठ्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून कानून बाह्य कृत्य केले आहे. तेंव्हा त्यांची तात्काळ बदली करून त्यांना निलंबित केले जावे अशी मागणी आम्ही यापूर्वी केली होती.
त्या प्रकरणाचा निकाल लावताना प्रांताधिकाऱ्यांनी तलाठ्याने तयार केलेली संबंधित डायरी रद्द करण्याचा आदेश दिला आहे. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी तलाठ्यांच्या विरोध निर्णय दिल्यानंतरही तलाठी अद्याप गावात कार्यरत का आहेत? त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली गेली पाहिजे. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या भ्रष्ट लोकांना प्रशासन का थारा देत आहे? त्यांना ताबडतोब निलंबित केले जावे.
भात वजनाच्या फसवणुकीत सामील असलेल्या व्यापाऱ्यांवर ही कारवाई केली जावी अशी मागणीही आम्ही निवेदनाद्वारे केली आहे. व्यापारी भाताच्या वजनात 5 ते 6 किलो काटा मारतात हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाची अधिकाऱ्यांनी नोंद करून घेतली असली तरी अद्याप कारवाई मात्र केलेली नाही. यासंदर्भात जाब विचारल्यास उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला बोलावून घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, असे आप्पासाहेब देसाई यांनी स्पष्ट केले.