बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवारी होणार असून महापौर पदाची राखीवता असलेल्या दोन्ही नगरसेविका केवळ भाजपकडेच असल्यामुळे महापौर पद बिनविरोध त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तथापि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असली तरी त्यामध्येही भाजपचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे.
बेळगाव महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. बेळगाव महापालिकेचे २२ वे महापौर पद अनुसूचित जाती (महिला) वर्गासाठी आरक्षित आहे. त्यासाठी संपूर्ण सभागृहात केवळ भाजपच्या प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका सविता कांबळे आणि प्रभाग क्रमांक ३५ च्या लक्ष्मी राठोड या पात्र उमेदवार आहेत. परिणामी निवडणूक बिनविरोध होऊन भाजपचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे उपमहापौरपद खुल्या वर्गासाठी आरक्षित असल्यामुळे या पदासाठी भाजपचे दोन नगरसेवक पात्र आहेत. काँग्रेसकडूनही कांहीजण इच्छुक असल्यामुळे उपमहापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे बहुमत असल्यामुळे या निवडणुकीतही भाजपच विजयी होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेत भाजपाचे ३५, काँग्रेसचे ९, समितीचे ३, एमआयएमचा १ तर अपक्ष म्हणून १० नगरसेवक असे संख्याबळ आहे. मनपावर असलेली भाजपाची सत्ता लक्षात घेता ३५ जणांचे मतदान, २ आमदार आणि १ खासदार याचबरोबर अपक्ष नगरसेवकांचे झुकते मापदेखील भाजपाकडे असेल अशी शक्यता दिसून येत आहे. यामुळे महापौरपदी बिनविरोध भाजपाचाच सदस्य निवडून येणार हे निश्चित आहे. तर उपमहापौर पदासाठी आनंद चव्हाण आणि राजू भातकांडे या दोघांची नावे चर्चेत असल्याचे समजते. कदाचित उपमहापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेत ऑपरेशन हस्त राबवून सत्ता ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून अंतर्गत प्रयत्न होत होते. मात्र आता महापौर पदाची राखीवता असलेल्या नगरसेविका केवळ भाजपकडेच असल्यामुळे ऑपरेशन हस्त थंडावले आहे. सध्या अधिवेशन सुरु असल्याने या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार आणि मंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत.
उद्या सकाळी ९ वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होईल. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरणा, छाननी, माघार आणि त्यानंतर गरज भासल्यास हात उंचावून मतदान घेण्यात येणार आहे. अन्यथा बिनविरोध निवडूची घोषणा केली जाईल. महापौर -उपमहापौर निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर हे काम पाहणार आहेत.