belgaum

बेळगाव लाईव्ह : संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीची प्रतीक्षा लवकरच संपणार असून येत्या १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची मुदत सोमवार दि. 5 रोजी संपली असून नूतन महापौर-उपमहापौर निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. सदर निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुरु होईल. सकाळी ९ ते ११ या वेळेत या दोन्ही पदांसाठी अर्ज स्वीकारले जातील. दुपारी एक वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. आधी अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया होईल. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाईल.

आगामी काळात लोकसभा निवडणूक होऊ घातल्याने मनपाची ही निवडणूक कधी जाहीर होणार? निडवणूक होणार की नाही? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यास महापौर – उपमहापौर निवडणुकीत अडचण येणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र प्रादेशिक आयुक्त एस. बी. शट्याण्णवर यांनी १५ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याचे जाहीर केले असून इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेच्या कौन्सिल विभागाला पत्र आले असून आता निवडणूक जाहीर झाल्याने महापालिकेतील राजकारणातदेखील मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपच्या खासदार मंगला अंगडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, विधान परिषद सदस्य आणि एक आमदार असे एकूण चार मतदार आहेत. तर काँग्रेसकडे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ असे तीन मतदार आहेत.

ही निवडणूक गुरुवार दि. १५ रोजी होणार असून तोपर्यंत हंगामी महापौर-उपमहापौर म्हणून पूर्वीच्याच शोभा सोमणाचे आणि रेश्मा पाटील यांच्याकडे कार्यभार राहणार आहे. तसेच त्यांना पालिकेतील कक्ष आणि वाहन वापरता येणार आहे. मात्र त्यांना कोणतीही बैठक घेता येणार नाही. किंवा महापौर – उपमहापौर म्हणून कोणत्याही बैठकीत सहभागी होता येणार नाही. मनपा कायदा १९७६ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली झाली असली तरी त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झाली नाही. अद्याप दुडगुंटी यांनी पदभार सोडला नाही त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपर्यंत आयुक्तपदी तेच कायम राहतील का? याची उत्सुकता लागली आहे.

महापौरपदासाठी अनुसूचित महिला तर उपमहापौरपद हे सर्वसामान्यासाठी आरक्षित आहे.

महापौरपदासाठी सध्या असलेल्या नगरसेवकांमध्ये दोन अनुसूचित महिला आहेत. त्यामधील एका महिलेला संधी मिळणार आहे. नगरसेविका लक्ष्मी राठोड आणि सविता कांबळे या दोन महिलांना संधी आहे. सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. एकूण ३५ नगरसेवक भाजपचे आहेत. तर २ खासदार, एक आमदार आणि एक विधान परिषद सदस्य असे एकूण ३९ मतदार आहेत. काँग्रेसकडे एकूण १० नगरसेवक आणि ३ आमदार असे एकूण १३ मतदार आहेत. एमआयएमचा १ नगरसेवक, म. ए. समिती ३ आणि ९ अपक्ष असे एकूण १३ नगरसेवक आहेत. हे १३ नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देणार असल्यामुळे २६ मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.