बेळगाव लाईव्ह : महापौर – उपमहापौरांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिका महापौर – उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्या आहेत. बेळगाव मनपावर भाजपाची जरी सत्ता असली तरी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरु केल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे.
भाजपकडे एकूण ३९ संख्याबळ आहे. तर विरोधीगटाकडे काँग्रेस, म. ए. समिती, एमआयएम, अपक्ष असे सर्व मिळून २४ संख्याबळ आहे. तर दोन अपक्षांनी मागीलवेळी भाजपला पाठिंबा दिला होता. महापौरपदासाठी अनुसूचित महिलांमध्ये सत्ताधारी गटामध्ये २ महिला आहेत. लक्ष्मी राठोड व सविता कांबळे या दोन महिला नगरसेवक आहेत. संख्याबळ पाहता सध्या भाजपचे पारडे जड असले तरी काँग्रेस ते पालटण्यासाठी प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्याण्णवर यांनी महापौर-उपमहापौर निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी अनुसूचित महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये केवळ दोनच महिला असल्याने स्पर्धा कमी आहे. मात्र उपमहापौरपद सर्वसामान्यासाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर-उपमहापौर होणार आहे. असे असले तरी उपमहापौरपदासाठी अनेकजण रिंगणात उतरणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे सध्या असलेल्या सत्ताधारी गटामध्ये यापूर्वीच दोन गट पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपची सत्ता असली तरी काँग्रेसनेही काही जणांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे यावेळेची महापौर-उपमहापौर निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.