बेळगाव लाईव्ह:एका चॅनलचा पत्रकार असल्याचे सांगत फिरणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तोतया पत्रकारावर शहरातील मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयिताचे नांव रमजान सुभान मुजावर (वय 40, रा. संख ता. जत जि. सांगली) असे आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रमजान हा काल मंगळवारी बेळगावात आला होता. कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथे कार घेऊन आलेल्या रमजानच्या कार गाडीवर मोठ्या अक्षरात एका चॅनलचा लोगो व त्याखाली एमडी असे लिहिले होते.
त्याच चॅनलच्या स्थानिक पत्रकाराने त्याला याबाबत विचारणा केली. त्यावेळी रमजानने मी मराठी चॅनलचा पत्रकार असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ओळखपत्र व नियुक्ती पत्राची मागणी करून दोन्ही कागदपत्र तपासून पाहिले असता ती बनावट असल्याचे आढळून आले.
त्यावरून रमजान मुजावर हा तोतया पत्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तेंव्हा पोलिसांनी कार जप्त करून रमजान वर गुन्हा दाखल केला आहे.