बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणातील तिसरे ‘पॉवर सेंटर’ मानल्या जाणाऱ्या सतीश जारकीहोळी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत बेळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेस हायकमांडने सुरु केल्याची चर्चा सुरु आहे.
एकीकडे सतीश जारकीहोळी समर्थक गटाने जारकीहोळी यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे तर दुसरीकडे विरोधकांनी सतीश जारकीहोळी यांनाच उमेदवारी द्यावी, अशी काँग्रेस हायकमांडकडे मागणी केल्याचे समजते. यावरून राज्याच्या राजकारणातून सतीश जारकीहोळी यांना थेट दिल्लीच्या राजकारणात पाठवून कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अधिक बळ देण्याची रणनीती आखण्यात येत असल्याचेही निदर्शनात येत आहे.
सतीश जारकीहोळी यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देऊन एकाच निशाण्यात अनेक पक्षी मारण्याची योजना काँग्रेस हायकमांडने आखली आहे. भाजपमधून काँग्रेसप्रवेश केलेले लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद देऊन एका वरिष्ठ नेत्याला आपल्या पक्षात कायम ठेवण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पक्षाने सतीश जारकीहोळी यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून अनेक राजकीय डावपेच आखल्याचीही चर्चा आहे.
भाजपने यंदाच्या निवडणुकीतही मंगला अंगडी यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसकडून प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा आहे. सतीश जारकीहोळी यांच्या करिष्म्याच्या जोरावर प्रियांका जारकीहोळी सहज जिंकू शकतील, शिवाय राजकारणात जरी विरोधी पक्षात कार्यरत असले तरीही जारकीहोळी बंधू नक्कीच प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देतील आणि विजयीही करतील, असे गणित मांडण्यात येत आहे.
सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी दिल्यास भाजपचा बालेकिल्ला ढासळून काँग्रेसचा वरचष्मा दिसून येईल. सतीश जारकीहोळी यांच्याजागी लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद देण्यात येईल. बेळगाव जिल्हा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी शक्यता आहे तसे झाल्यास जिल्ह्यात वेगळे चित्र निर्माण होऊ शकते.
राजकीय वर्तुळात आणि काँग्रेस हायकमांडच्या विचारात सतीश जारकीहोळी यांचे नाव जरी असले तरी सतीश जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणुकीत स्वारस्य दाखविल्याचे दिसून येत नाही. पोटनिवडणुकीत सतीश जारकीहोळी यांचा केवळ ५ हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र राज्याच्या राजकारणात अधिकाधिक जागांवर काँग्रेसची सत्ता आणण्यात सतीश जारकीहोळी यांचा असलेला सिंहाचा वाटा लक्षात घेऊन हायकमांडने त्यांनाच निवडणूक लढविण्याची सूचना दिल्याचे संकेत मिळत आहेत.
सतीश जारकीहोळी समर्थक गटातील केपीसीसी सदस्या आयेशा सनदी यांनी सतीश जारकीहोळी यांची राज्याच्या राजकारणातच अधिक गरज असून त्यांना उमेदवारी देण्यात आल्यास आपण आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे. जिल्ह्यात अनेक प्रभावी नेतेमंडळी आहेत. त्यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर यांची नावे घेतली जातात. त्यामुळे या नेत्यांना उमेदवारी देऊन राज्याच्या विकासासाठी सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वालाच प्राधान्य देण्याची मागणीही होत आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ आणि एकंदर राज्यातील राजकारण पाहता संपूर्ण राज्याचे लक्ष बेळगाव लोकसभा मतदार संघावर खिळले आहे. राज्यातील तिसरे महत्वाचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या सतीश जारकीहोळी यांचा वापर काँग्रेस हायकमांड ‘हुकुमी एक्क्याप्रमाणे’ करून बेळगावमधील भाजपचा वरचष्मा गाढून विधानसभा निवडणुकीप्रमाणेच बेळगाववर आपले वर्चस्व प्रस्थापित करेल का? सतीश जारकीहोळी यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून राज्यातील सत्तेला अधिक बळ देण्यात काँग्रेस सरकार यशस्वी ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.