Tuesday, May 28, 2024

/

…तर बीम्स ठरेल ‘इलिझारोव्ह तंत्र’ शिकवणारी पहिली संस्था

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जर सर्व कांही योजनेनुसार सुरळीत झाले तर, बेळगावची सरकारी मालकीची बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था (बीम्स) ही भारतातील पहिली संस्था असेल जिच्यामध्ये येत्या काळात डॉक्टरांना इलिझारोव्ह तंत्र शिकवले जाईल, असे बीम्सचे ऑर्थोपेडिक्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक व प्रख्यात इलिझारोव्ह सर्जन डॉ. सतीश नेसरी यांनी सांगितले.

इलिझारोव्ह असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी सदस्य व कर्नाटक प्रभारी असलेले डॉ. नेसरी हे उत्तर कर्नाटकात 2010 मध्ये इलिझारोव्ह पद्धत आणणारे पहिले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तेंव्हापासून ते या पद्धतीचा वापर करत असून जिल्हा रुग्णालयात 5000 गरीब (बीपीएल) आणि गरजू रुग्णांवर त्यांनी इलिझारोव्ह पद्धतीने शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियांपैकी बहुतेक सर्व विनामूल्य करण्यात आल्या आहेत. या संदर्भात बोलताना डॉ. नेसरी यांनी उजव्या पायाच्या आणि घोट्याच्या बर्न कॉन्ट्रॅक्चरच्या विकृतीची एका रुग्णाची माहिती दिली.

सदर 19 वर्षीय रुग्ण मुलगी पाय वळलेल्या अवस्थेत घोट्यावर चालत होती. ही विकृती बरी होत नसल्याचे सांगून अनेक शल्यचिकित्सकांनी तिला विच्छेदनचा सल्ला दिला. त्यावेळी इलिझारोव्ह तंत्र तिच्या बचावासाठी आले. डॉ. नेसरी म्हणाला की, इलिझारोव्ह शस्त्रक्रिया अशा परिस्थितीत जादू करू शकते आणि त्यामुळे त्या मुलीचे शरीराचे एक अंग वाचले. आणखी एका प्रकरणात बालपणी उजव्या पायाच्या जळजळीच्या विचित्र विकृतीमुळे मुलीला चालता येत नव्हते. अनेक शल्यचिकित्सकांनी तिच्या गुडघा खालील पायाचे विच्छेदन करावे लागेल असा सल्ला दिला. तथापी इलिझारोव्हच्या शस्त्रक्रियेने ती बरी झाली, असे डॉ. नेसरी यांनी सांगितले.

 belgaum

बीम्समध्ये 2007 मध्ये मी जेंव्हा रुजू झालो त्यावेळी अनेक रुग्णांना भेटलो ज्यांना इलिझारोव्ह शस्त्रक्रिया करण्याची अत्यंत गरज होती असे सांगून डॉ. सतीश नेसरी म्हणाले की, उत्तर कर्नाटक किंवा आसपासच्या प्रदेशात इलिझारोव तंत्रात तज्ञ असलेले डॉक्टर नाहीत. ज्यांच्याकडे आपण रुग्णांना पाठवू शकतो. त्याचप्रमाणे बिम्स सारख्या सरकारी हॉस्पिटलमध्ये येणारे बहुतेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने त्यांना बेंगळुरू किंवा मुंबईसारख्या शहरात खाजगी रुग्णालयात पाठवणे शक्य नसते असे सांगून ही गरज ओळखून मी चीनमध्ये फेलोशिप केली आणि डॉ. मिलिंद चौधरी यांच्यासोबत काम केले. त्यांनी इलिझारोव्ह तंत्र थेट प्रोफेसर इलिझारोव्ह यांच्याकडून आत्मसात केले. ज्यांनी या तंत्राचा शोध लावला आहे, अशी माहिती डॉ. नेसरी यांनी दिलीBims

इलिझारोव्ह तंत्रात फेलोशिप पूर्ण केल्यानंतर डॉ. नेसारी यांनी 2010 पासून त्या तंत्राने रूग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2014 -15 मध्ये ते जगातील सर्वोत्कृष्ट इलिझारोव्ह सर्जन चीनचे प्रा. सिहे किनोफ यांना भेटले. त्यांच्याकडून त्यांनी शरीराच्या अवयवांची विकृती सुधारणे आणि इलिझारोव्ह तंत्राशी संबंधित इतर अनेक कौशल्ये आत्मसात केली. डॉ. नेसारी म्हणाले की, शस्त्रक्रियेमध्ये इलिझारोव्ह उपकरणे अंगातील हाडांची लांबी वाढवण्यासाठी किंवा त्यांचा आकार बदलण्यासाठी वापरली जातात. अंग पुनर्संचयित करणे ही एक संथ प्रक्रिया आहे. जी रुग्णाच्या हाडांची आणि मऊ ऊतकांची सामान्य स्थिती, लांबी आणि कार्य पुनर्संचयित करण्यात मदत करते, जी एक आधुनिक खासियत आहे. हे तंत्र शिकवणाऱ्या दर्जेदार प्राध्यापक असलेल्या मोजक्या भारतीय डॉक्टरांपैकी मी एक आहे, असेही डॉ. सतीश नेसरी यांनी स्पष्ट केले.

इलिझारोव्ह तंत्राचे उपचार महागडे असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या रुग्णांना ते परवडत नाहीत. तथापी हे उपचार बिम्समध्ये मोफत दिले जात असल्यामुळे रूग्णांची रूग्णालयात चांगलीच गर्दी होत आहे, असे डॉ. नेसरी यांनी सांगितले. दोन पदव्युत्तर पदवीधर (प्रथम वर्ष) डॉक्टर्स ज्यांनी आधीच या डॉक्टरांच्या हाताखाली शिकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी इलिझारोव्हवर त्यांचे कार्य सादर केले आणि नुकतेच पेपर प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन या दोन्ही प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. इंडियन फूट ॲण्ड एंकल सोसायटी आणि महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनतर्फे आयोजित सोलापूर ट्रॉमा मीटमध्ये डॉ. रक्षित यांना सर्वोत्कृष्ट पेपरचा पुरस्कार आणि डॉ. मंजुनाथ डिग्गाई यांना सर्वोत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार मिळाला आहे. माझ्या माहितीनुसार, ऑर्थोपेडिक कॉन्फरन्सच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की सर्वोत्कृष्ट पेपर आणि सर्वोत्कृष्ट पोस्टरसाठीची दोन्ही सुवर्ण पदके बिम्स या ऑर्थोपेडिक विभाग असलेल्या एकाच संस्थेने जिंकली आहेत, असे डॉ. नेसरी यांनी शेवटी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.