Sunday, October 6, 2024

/

युवा वकिलांसाठी राबवणार मार्गदर्शनपर उपक्रम -ॲड. किवडसण्णावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष:माझ्या आजपर्यंतच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी वकिलांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबरच समुदाय भवनाची उभारणी, सरकारी वकिलांसाठी खास चेंबर निर्मिती अशी हितावह कामे केली आहेत. आता बेळगावचे जास्तीत जास्त वकील उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत राहावे या उद्देशाने उदयोन्मुख युवा वकिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आणि प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची माझी योजना आहे, अशी माहिती बेळगाव बार असोसिएशनचे विक्रमी सहाव्यांदा अध्यक्ष बनलेल्या ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी दिली.

बेळगाव बार असोसिएशनची लक्षवेधी निवडणूक गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा शांततेत पार पडली त्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. एस. एस. किवडसण्णावर विजयी झाले. या पद्धतीने अध्यक्षपदी सहाव्यांदा निवड होणारे ते बेळगाव येथील पहिले वकील असल्यामुळे ॲड. किवडसण्णावर यांच्याशी संपर्क साधून बेळगाव लाईव्हने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली.

आपल्या वकिली व्यवसायाच्या कारकिर्दीत सहाव्यांदा बेळगाव बार असोसिएशनचे प्रतिष्ठेचे अध्यक्षपद भूषवणारे ॲड. किवडसण्णावर हे मूळचे बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ गावचे रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातील असलेल्या ॲड. किवडसण्णावर यांचे गावातील शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये कला शाखेची (बीए) पदवी मिळविली. तसेच कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून राज्यशास्त्र हा विषय घेऊन स्नातकोत्तर (एमए) पदवी आणि त्यानंतर विद्यापीठाच्या कायदा महाविद्यालयातून एलएलबी ही कायद्याची पदवी संपादन केली. दिवाणी आणि फौजदारी खटले हाताळण्याचा हातखंडा असलेले ॲड. एस. एस. किवडसण्णावर हे 1990 पासून बेळगाव न्यायालयामध्ये वकिलीचा व्यवसाय करत आहेत. मध्यंतरी 1999 मध्ये वर्षभरासाठी ते बैलहोंगल न्यायालयात कार्यरत होते.

ॲड. एस. एस. किवडसण्णावर म्हणाले की, यापूर्वी पाच वेळा मी बेळगाव बार असोसिएशनचा अध्यक्ष झालो आहे. गेल्या 2003 पासून 2011 पर्यंतच्या कालावधीत मी चार वेळा बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे वाहिली आहे. त्यानंतर 2016 ते 2018 या कालावधीत मी पुन्हा अध्यक्ष झालो होतो. त्यानंतर आता 2024 मध्ये सहाव्यांदा माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. गत पाच वेळच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत आपण कोणती उल्लेखनीय कामं केलीत? या प्रश्नाला उत्तर देताना ॲड. किवडसण्णावर म्हणाले की, 2003 मध्ये तरुणपणी जेंव्हा मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी नव्या न्यायालय आवारात माझ्या पुढाकाराने समुदाय भवनांची निर्मिती झाली. तेंव्हा आमच्याकडे संघटनेकडे अवघा 3 लाख रुपयांचा निधी होता. खासदार सुरेश अंगडी यांनी त्यावेळी 3 लाख रुपयांची देणगी दिली. याव्यतिरिक्त शहरातील ज्येष्ठ वकिलांनी वैयक्तिकरित्या 25 -50 हजार रुपयांची तसेच असंख्य वकीलवर्गाने आपापल्या परीने शक्य होईल तितकी आर्थिक मदत देऊ केली.Kivadsannavar

या सर्व निधीतून मी समुदाय भावनांच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील आम्हाला मदत केली. विद्यमान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार रमेश कुडची यांनी त्यावेळी आम्हाला आपल्या वैयक्तिक निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले होते. सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे अवघ्या 2 वर्षात आम्ही समुदाय भवनाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण केले होते. या समुदाय भवनाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन कायदामंत्री एच. के. पाटील यांना निमंत्रित केले होते. तेंव्हा मी त्यांना पुणे, मुंबई, दिल्ली येथील न्यायालयाच्या ठिकाणी सरकारी वकीलांकरिता जशी खास चेंबरची सोय असते तशी सोय बेळगाव न्यायालयाच्या ठिकाणी करून द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती कायदामंत्री पाटील यांनी मान्य करताना राज्यात तशा चेंबरची निर्मिती बेळगाव न्यायालयापासून सुरू होईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आपल्या न्यायालयामध्ये सरकारी वकिलांसाठी खास चेंबर स्थापन करण्यात आले. इतकेच नव्हे तर माझ्या विनंतीचा परिणाम असा झाला की बेळगाव मागोमाग राज्यातील अन्य जिल्हा न्यायालयांच्या ठिकाणी दखील सरकारी वकिलांसाठी विशेष चेंबर निर्माण केले गेले.

बेळगाव बार असोसिएशन या संघटनेची 1976 मध्ये अधिकृत नोंदणी झाल्यानंतर नियमानुसार तिचे नूतनीकरण झाले नव्हते. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत 2011 मध्ये जी. एम. पाटील बेळगाव सहकार खात्याचे उपनिबंधक असताना मी ते नूतनीकरण करून घेतले. त्याचप्रमाणे 2016 ते 18 या कालावधीत अतिरिक्त चेंबर निर्मितीसाठी उच्च न्यायालय व सरकारने 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र त्याच कालावधीत कोरोना प्रादुर्भावाचे संकट कोसळल्यामुळे निधी वितरित होऊ शकला नाही. पुढे मी मंजूर करून घेतलेला निधी मिळविण्यासाठी नंतरच्या नव्या कार्यकारिणींनी पाठपुरावाच केला नाही. आता संबंधित अतिरिक्त चेंबर निर्मितीसंदर्भात मी कालच जिल्हा पालक मंत्र्यांना भेटून आलो आहे. याखेरीज न्यायालय आवारात स्वच्छ दर्जेदार कॅन्टीन सुरू करण्याबरोबरच वकिलांसाठी आणखी दोन अतिरिक्त चेंबर निर्माण करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी जागाही निश्चित केली असून लवकरात लवकर ही विकास कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या ठिकाणी काम केलेल्या ॲड. उज्वल निकम वगैरे यांसारख्या ज्येष्ठ अनुभवी वकिलांना निमंत्रित करून युवा उदयोन्मुख वकिलांसाठी मार्गदर्शनपर शैक्षणिक व्याख्यानमाला आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा उपक्रम मी राबवणार आहे.

बेळगावातील जास्तीत जास्त युवा वकील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कार्यरत रहावेत हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असे ॲड. एस एस. किवडसण्णावर यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.