बेळगाव लाईव्ह:साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, गझल किंवा वृत्तपत्रातला लेख, वाचकांचं पत्र असेल अशा कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तीचे महत्त्व इतके आहे की ती कळत नकळत आपला भोवताल घडवत असते, भोवतालाला आकार देत असते. प्राणी अवस्थेतील माणसापासून आत्ताच्या आपल्यासारख्या प्रगतशील माणसाविषयी संवेदनशील असलेल्या माणुसकीयुक्त माणसापर्यंतचा प्रवास हा या संवादाने, अभिव्यक्तीने घडवला आहे, असे विचार महाराष्ट्रातील संपादक, सुप्रसिद्ध लेखक व स्तंभ लेखक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
येळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने आज रविवारी आयोजित 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. संपादक श्रीराम पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाची सुरुवात येळ्ळूर गावाच्या प्रशंसेने केली. येळ्ळूर सारख्या गावाने खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता जपली आहे. इंग्रजीला प्राधान्य देणाऱ्या सध्याच्या काळात आपण अशा व्यासपीठांवरून मराठीची चिंता करतो. संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलो आहे आणि त्यातून मला कळाले आहे की अशी चिंता करणारे आणि मराठी भाषा आपल्या परीने जपून ठेवणारे असे दोन घटक आहेत. चिंता करणारे चिंता करत राहतात. मात्र आजही आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी 15 लाख विद्यार्थी मराठी भाषेतून दहावी उत्तीर्ण होतात. मात्र मुद्दा त्यांना वाचनाकडे कसे वळवायचे? हा आहे. त्यामुळे येळ्ळूर हे अपवादात्मक गांव आहे ज्याने मराठी बाणा, मराठी ताठ कणा कायमस्वरूपी जपला आहे.
पत्रकार या नात्याने माझा अशा गावांशी कधी ना कधी संबंध आला आहे. येळ्ळूर हे गाव सतत आंदोलन करणार जागं गाव आहे. त्यामुळे या गावाशीही माझा संबंध आला असला तरी आज मात्र मी हे जे गाव बघतोय ते खूप वेगळे आहे. हे गाव खरोखर आगळं आहे. या ठिकाणी आपल्या भाषेबद्दलची कमालीची आस्था तर आहेच मात्र पतसंस्था ज्यांचा संबंध फक्त आर्थिक व्यवहाराशी असतो त्या पतसंस्थांना साहित्याविषयी कांहीतरी वाटतं, मराठी भाषेविषयी काहीतरी वाटतं, मराठी अस्मितेशी त्यांचे काहीतरी देणे -घेणे आहे हे कुठेतरी अपवादात्मक दिसते त्यामध्ये येळ्ळूर आहे, असे पवार म्हणाले.
वृत्तपत्रात लिखाण करणारा माणूस त्याला साहित्यिक म्हणावे की म्हणू नये. त्याने जे काही लिहिलं त्याला साहित्य मानावे की मानू नये, याविषयीचे असंख्य वाद आपल्याकडे पिढ्यानपिढ्या सुरू आहेत. तसेच वृत्तपत्रातले प्रत्येक लिखाण साहित्यिक मनावर रुतेल असे काही नाही. मात्र किमान मराठी वृत्तपत्रांचे मराठीतील सर्जनशील, ललित किंवा वैचारिक साहित्यामध्ये अत्यंत ठोस असे योगदान आहे. याचे कारण म्हणजे अनेक लेखकांचे पहिले लेखन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.
थोडक्यात वर्तमानपत्रांनी अनेक लोक लिहिते केले सुनीलकुमार लवटे यांच्यासारख्या मराठीतील ज्येष्ठ लेखक साहित्यिक संपादकाचे आत्मचरित्र वृत्तपत्राने प्रकाशित केले. वृत्तपत्रांनी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तर दिलेच, विशेष करून वैचारिक साहित्यामध्ये मराठी वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे. येळ्ळूरच्या शामराव देसाई यांच्यासारख्या साहित्यिकांनी असे कांही ना काही घडवून ठेवले की ज्यातून मराठी माणूस आणि मराठी बाणा घडला. थोडक्यात साहित्य आणि वृत्तपत्रांचे जवळचे नाते आहे. साहित्य हा व्यक्त होण्याचा प्रकार आहे. व्यक्त होणे अतिशय महत्त्वाचा आहे. साहित्यातील कथा असेल कादंबरी, कविता, गझल असेल किंवा वृत्तपत्रातला लेख, वाचकांचं पत्र असेल अशा कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तीचे महत्त्व इतके आहे की ती कळत नकळत आपला भोवताल घडवत असते, भोवतालाला आकार देत असते आणि म्हणूनच बोलत्या मनाचं, परस्पर संवादाचं, कम्युनिकेशनचं महत्त्वाचा उद्दिष्ट काय तर परिणाम घडवणे हे आहे.
प्राणी अवस्थेतील माणसापासून आत्ताच्या आपल्यासारख्या प्रगतशील माणसाविषयी संवेदनशील असलेल्या माणुसकीयुक्त माणसापर्यंतचा प्रवास हा या संवादाने, अभिव्यक्तीने घडवला आहे. जेव्हा एखादा माणूस काहीतरी सांगतो आणि ते दुसऱ्याच्या मनात जसेच्या तसे उतरत त्याची पडसाद उमटते तेव्हा संवादाची प्रक्रिया पूर्ण होते. काहीतरी नवं घडवण, नवा अर्थ तयार करणे तू लोकांपुढे मांडणे वाचणाऱ्यांच्या मनात नवे आकलन तयार करणे त्याचा प्रतिसाद मिळवणे हे सर्व साहित्याचं काम आहे ही प्रक्रिया होत असताना जेव्हा पृथक्करण घडतं त्यावेळी समाज उभा करणाऱ्या संस्कृतीमध्ये विकृतीची बीजं रोवली जातात आपण कळत नकळत अशा काळात आलो आहोत, असेही श्रीराम पवार यांनी स्पष्ट केले.
आज सकाळी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी पार पडल्यानंतर स्फूर्ती गीताने संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. यावेळी संमेलना अध्यक्ष कोल्हापूरचे श्रीराम पवार यांच्यासह उद्घाटक हॉटेल उद्योजक सूर्यकांत शानभाग, माजी महापौर सरिता पाटील, गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, ज्योती पठाणीया (पुणे), वसंत हंकारे (सातारा), येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटाराचे, यल्लोजीराव मेणसे, अर्जुनराव गोरल, अरुण सुळगेकर, रावजी पाटील, आर. एम. चौगुले, महेश जुवेकर शांताराम कुगजी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी राष्ट्रवीर कार शामराव देसाई साहित्य पुरस्कार श्रीराम पवार यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार -मल्लेश चौगुले, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार -ज्योती पठाणीया, गुरुवर्य गावडे पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार -एम. बी. बाचीकर, विशेष साहित्य पुरस्कार -सुनंदा शेळके, कै. कृष्णा मुचंडी पत्रकारिता पुरस्कार -गोपाळ गावडा क्रीडा पुरस्कार -सुजय संजय सातेरी, कृषी पुरस्कार -दौलत कुगजी या पद्धतीने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे येळ्ळूर गावातील व्यक्तींच्या निधनाबद्दल श्रद्धांजलीचा ठराव तसेच सर्वोच्च न्यायालयात गेली 20 वर्षे प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाची सुनावणी व्हावी, साहित्यिक व पत्रकारांना शासनाच्या वतीने मानधन दिले जावे आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत त्या कृत्यांचा त्वरित बंदोबस्त करून लोकशाहीचा आदर राखावा, हे ठराव संमेलनात संमत करण्यात आले.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ
सालाबाद प्रमाणे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने सीमा सत्याग्रही, स्वातंत्र्यसैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलननगरी येथे आयोजित 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला आज रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीने अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे नेहमीप्रमाणे यंदाही भव्य पद्धतीने 19 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलनाची सुरुवात आज सकाळी पारंपरिक ग्रंथदिंडीने झाली. गावातील श्री चांगळेश्वरी मंदिराच्या ठिकाणी ग्रंथ पूजन करून सदर ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. स्ववाद्य निघालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष संपादक, लेखक, स्तंभ लेखक श्रीराम पवार यांच्यासह उद्घाटक माजी महापौर सरिता पाटील, पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठाणीया, साताऱ्याचे वसंत हंकारे, तानाजी कुंभार आदी मान्यवरांसह येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी सदस्य आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वारकरी भजनी मंडळ, पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेतील लहान मुले, ढोल -ताशा पथक, अग्रभागी असलेले युवतींचे लेझीम पथक आदींमुळे मोठ्या जल्लोषात निघालेली ही ग्रंथदिंडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी संमेलनाध्यक्षांसह इतर मान्यवरांच्या हस्ते दिंडीच्या मार्गावरील छ. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
श्री शिवाजी विद्यालय मैदानावरील सीमा सत्याग्रही, स्वातंत्र्यसैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलननगरी येथे ग्रंथदिंडीची सांगता झाली. यावेळी माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते संमेलननगरीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कृष्णा बिजगरकर यांच्या हस्ते सीमा सत्याग्रही दिवंगत केदारी नागोजी गोरल प्रवेशद्वाराचे तर उद्योजक श्रवण कुमार हेगडे यांच्या हस्ते दिवंगत राजा शिरगुप्पे ग्रंथ दालनाचे उद्घाटन झाले. स्वामी विवेकानंद सोसायटी सभा मंडपाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी, तर स्वामी विवेकानंद विचार पिठाचे उद्घाटन ॲड. सागर खन्नुरकर यांनी केले. याप्रसंगी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.