बेळगाव लाईव्ह:योध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुष्ठान विधीना सध्या प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने बेळगावच्या एका कारागिराचा हा विशेष परिचय ज्याने 30 वर्षांपूर्वी थर्माकोलच्या सहाय्याने प्रारंभीच्या आराखड्यानुसार अयोध्येतील श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवून सर्वांची वाहव्वा मिळवली होती. त्यावेळी कॉलेज विद्यार्थी आणि आता संसारी गृहस्थ झालेल्या या कारागीराचे नांव आहे उमेश मारुती केळवेकर.
उमेश मारुती केळवेकर हे मिरापूर गल्ली, शहापूर येथील रहिवासी असून ते सोनार काम करतात. अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी श्रीराम मंदिराची उभारणी करण्याचा जेंव्हा निर्णय घेण्यात आला त्यावेळी उमेश कॉलेज विद्यार्थी होते.
तेंव्हा म्हणजे 1992 मध्ये श्रीरामाचे आणि अयोध्येतील श्री राम मंदिराचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले होते. अळवण गल्ली येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या उमेश केळवेकर यांच्यात कारागारीचे कौशल्य असल्यामुळे त्यावेळी त्यांनी श्री राम मंदिराच्या त्या पोस्टरवरून थर्माकोलच्या सहाय्याने त्या मंदिराची प्रतिकृती बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कॉलेजचा अभ्यास आणि घरचे काम यामधून सवड मिळेल तेंव्हा त्यांनी प्रतिकृती बनवण्याचे काम सुरू केले. तब्बल वर्षभराने त्यांच्या परिश्रमाला यश आले.
सध्याचे श्री राम मंदिर तीन मजली असले तरी त्यावेळी 1994 मध्ये तत्कालीन आराखड्याप्रमाणे अयोध्येतील दुमजली श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उमेश यांनी तयार केली. सदर प्रतिकृतीचे त्यावेळी मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. प्रसिद्धी माध्यमानी देखील उमेश केळवेकर यांच्या कला कौशल्याला सचित्र प्रसिद्ध दिली. त्यानंतर गणेशोत्सव वगैरे उत्सव काळात प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या केळवेकर यांनी तयार केलेल्या थर्माकोलच्या अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिकृतीची भरभरून प्रशंसा झाली.
सदर प्रतिकृती बनवताना 19 -20 वर्षाचे कॉलेज युवक असणारे उमेश मारुती केळवेकर आज 48 वर्षाचे झाले आहेत. आपल्या तरुण वयात स्वतःच्या हाताने तयार केलेला आयोध्यातील श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचा अमूल्य ठेवा उमेश यांनी आज देखील जपून ठेवला आहे.
विशेष म्हणजे या प्रतिकृतीमध्ये 320 एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत जे थर्माकोलच्या श्री राम मंदिराची शोभा वाढवतात.
थोडक्यात उमेश केळवेकर यांनी 3 दशकांपूर्वी तयार केलेली श्री राम मंदिराची प्रतिकृती अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष ठरते हे निश्चित.