बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळण्यासाठी मराठा समाजाची एकजूट ज्या पद्धतीने दिसून आली त्या पद्धतीची एकजूट आपण सीमावर्तीय भागात निर्माण केली पाहिजे. आपल्या 865 गावांमध्ये चेतना निर्माण केली पाहिजे. कारण आपली महाराष्ट्रात जाण्याची मागणी गेली 50 -60 वर्षे प्रलंबित आहे. मराठा समाज महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकवटला तसा सीमाभागात तो एकवटला पाहिजे, असे विचार साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील शहापूर येथील छ. शिवाजी महाराज उद्यानामध्ये सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्रात मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की प्रामाणिकपणे जे आंदोलन उभे केले जाते त्याची परिणीती नेहमीच यशामध्ये होत असते आणि त्याची प्रचिती मनोज जरांगे -पाटील यांच्यामुळे आली आहे. आज महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण देणे भाग पडलं. याचे कारण म्हणजे मराठा समाजाची महाराष्ट्राप्रती असलेली निष्ठा होय. महाराष्ट्राने ज्या ज्या वेळी प्रगती साधली, ज्या ज्या वेळी महाराष्ट्र पुरोगामी झाला पुढे जात राहिला, त्यावेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठा समाजाने अग्रक्रमाने कार्य केले आहे. महाराष्ट्र घडावा तो मोठा व्हावा महाराष्ट्र आणि देशभरात अग्रक्रमाने राहावे. या सर्व गोष्टींमध्ये मराठा समाज नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र कालपरत्वे दुर्दैवाने मराठा समाजाचीच पिछेहट होत राहिली. कारण मराठा समाज हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा समाज होता.
हळूहळू शेतीचे विभाजन होऊ लागले तस तसा मराठा समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल होत चालला आणि काळाच्या ओघात मराठा समाजाला आपली प्रगती साधण्यासाठी नोकरी किंवा अन्य गोष्टींवर विसंबून राहावे लागले. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे वाटू लागलं. यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा आंदोलन उभं केलं आणि हे आंदोलन उभं करताना त्यांनी सकल मराठ्यांना एकत्र केलं. मराठा समाजाचा रेटा उभा केला. परंतु प्रदीर्घ सरकारांनी मराठा समाजाच्या या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले नाही आणि हळूहळू मराठा समाजात चेतना जागृत झाली. मराठा समाज आक्रमक होऊ लागला आणि जसा जसा मराठा समाज आक्रमक होत गेला तसा तसा आरक्षणाच्या मागणीचा रेटा वाढत गेला. गेली अनेक वर्षे मराठा समाजाने मूक मोर्चे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली बेळगावातही आपण जवळपास दहा-बारा लाख लोक रस्त्यावर आणून मूक मोर्चा काढला. मराठा समाजाच्या मागणीकडे आपण जगाचं लक्ष वेधलं. मात्र दुर्दैवाने तरीही सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही. मात्र मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनामुळे हळूहळू सरकारच्या लक्षात आल की फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील मराठा समाज एकत्र येऊ लागला आहे. जरांगे -पाटील यांनी लाखो मराठ्यांसह जेंव्हा मुंबईकडे कूच केली तेंव्हा एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत एकवटला तर ते आपल्याला परवडणार नाही हे सरकारच्या लक्षात आलं. त्यावेळी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःहून जातीने वाशीत आले आणि त्यांनी आरक्षणाचा मसुदा जरांगे पाटील यांच्या हातात दिला.
हे यश मिळवण्यासाठी मराठा समाजाची एकजूट ज्या पद्धतीने दिसून आली. त्या पद्धतीची एकजूट आपण सीमावर्तीय भागात निर्माण केली पाहिजे. आपल्या 865 गावांमध्ये चेतना निर्माण केली पाहिजे. कारण आपली महाराष्ट्रात जाण्याची मागणी गेली 50 -60 वर्षे प्रलंबित आहे. मराठा समाज महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकवटला तसा सीमाभागात तो एकवटला पाहिजे. कारण हा प्रश्न आमच्या अस्मितेचा, आमच्या भाषेचा, जमिनीचा, तरुणांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण सर्वांनी तशाच पद्धतीचे आंदोलन येथे उभारले पाहिजे तरच ते दिल्लीपर्यंत पंतप्रधान, राष्ट्रपतींपर्यंत पोहोचेल आणि आपली न्याय मागणी मान्य होईल. आपली संस्कृती टिकायची असेल तर भाषा टिकली पाहिजे आणि भाषा टिकवायची असेल तर आपली माणसं एकत्र आली पाहिजेत हा संदेश घेऊन आपण मनोज जरांगे -पाटील यांच्या यशस्वी आंदोलनाचे स्वागत करूया, असे पाटील म्हणाले.
मराठा समाजाचे नूल (महाराष्ट्र) येथील मठाधीश प.पू. श्री भगवानगिरी महाराज मराठा समाजाने संघटित होऊन आपली प्रगती साधली पाहिजे यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. मराठा समाजाला गुरु नाही किंवा स्वामी नाही अशी वदंता पसरविली जाते. त्याला छेद देणारी घटना आपल्याला माहीत असली पाहिजे ती म्हणजे गेले हजारो वर्षापूर्वीचा मराठा समाजाचा मठ नूल येथे आहे त्यामुळेच आयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प.पू. श्री भगवानगिरी महाराज यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्याबद्दल आज त्यांचा आपला बेळगावचा सकल मराठी समाज आणि वारकरी संप्रदायातर्फे सत्कार करण्यात येत असल्याची माहिती गुणवंत पाटील यांनी यावेळी दिली. तसेच या सर्व गोष्टींचा, सर्व घटनांचा एकत्र समुच्चय आपण समजून घेतला पाहिजे तो म्हणजे आपण मराठा, मराठी माणूस सर्वांनी संघटित राहून आपला संघर्ष सुरू ठेवला पाहिजे असेही. पाटील यांनी स्पष्ट केले.
छ. शिवाजी महाराज उद्यानामध्ये आज रविवारी सकाळी महाराष्ट्रात मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर नूल येथील मराठा मठाचे प.पू. भगवानगिरी महाराज आदी मान्यवरांच्या हस्ते उद्यानातील सिंहासनारूढ छ. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित आणि एक मराठा लाख मराठा, सकल मराठा समाजाचा विजय असो, मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांचा विजय असो, मनोज जरांगे -पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन उद्यान परिसर दणाणून सोडला होता. विजयोत्सवाचे औचित्य साधून श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थिती दर्शवून परतलेल्या प.पू. भगवानगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा समाजाचे नेते प्रकाश मरगाळे, आर एम चौगुले,ॲड. अमर येळ्ळूरकर, साहित्यिक गुणवंत पाटील, हभप शंकर बाबली महाराज,सागर पाटील, विकास कलघटगी अमित देसाई, सुनील जाधव चंद्रकांत कोंडूस्कर,रमेश रायजादे ,महादेव चौगुले, संजय मोरे, गणेश दद्दीकर, आदींसह मराठा समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.