बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार कॉर्नरवर मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन सदर पाणी गळती थांबविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गणपत गल्ली, खडेबाजार कॉर्नरवर रस्त्याकडेला असलेल्या भूमिगत मुख्य जलावाहिनीच्या व्हॉल्वला गेल्या पंधरा दिवसांपासून गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे.
या संदर्भात तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याचे समजते. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. त्याचप्रमाणे उन्हाळा कांही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत पाण्याची बचत आवश्यक असताना या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तरी शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
तसेच तात्काळ दुरुस्तीचा आदेश देऊन सदर पाणी गळती थांबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांसह परिसरातील व्यापारी आणि विक्रेत्यांकडून केली जात आहे.
यावर्षी झालेला कमी पाऊस आणि उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई याचा विचार केला असता महापौरांनी देखील शरीरातील पाणी गळत्या कमी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या तरी देखील बऱ्याच ठिकाणी पाणी गळत्या होताना दिसत आहेत यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण होत आहे.