बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक खाजगी भागीदारीत (पीपीपी) राज्य सरकारने पर्यटन विकास आणि स्मारकांचे संरक्षण करण्याची योजना आखली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सौंदत्ती यल्लमा डोंगराच्या ठिकाणी केबल कार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यटन विकास मंत्री एच. के. पाटील यांनी विधान सभेत दिली.
- विधानसभेत मंगळवारी सकाळी प्रश्नोत्तर चर्चेवेळी मूडबिद्रीचे आमदार उमानाथ कोट्यान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री एच. के. पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळ व पर्यटन स्थळांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत साहस करण्याजोग्या स्थळांसह धार्मिक, सांस्कृतिक, कृषी आदीचा समावेश असलेले 26 विभिन्न प्रकारचे पर्यटन प्रकल्प राबविले जाणार आहेत. संबंधित पर्यटन स्थळाच्या विकासासाठी या योजनेअंतर्गत पीपीपी पद्धतीने खाजगी कंत्राटदाराला कंत्राट दिले जाईल.
उत्तर कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी देवस्थानाला दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष लोक भेट देत असतात. त्यामुळे यल्लमा डोंगर हे धार्मिक पर्यटन स्थळ बनण्यास अतिशय योग्य असल्याचे सांगून या ठिकाणी केबल कार सुरू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आले असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
अम्युजमेंट पार्क कॅरवाॅन पार्क, कॅरवाॅन पर्यटन योजना, सांस्कृतिक ग्राम, पारंपारिक हॉटेल, पर्यावरण पर्यटन योजना, होम स्टे, हाऊस बोट योजना, रोप-वे, एडव्हेंचर टुरिझम, कृषी पर्यटन अशा सुमारे 26 पर्यटन क्षेत्रांच्या विकासाच्या भांडवल गुंतवणुकीसाठी विविध संस्थांची मदत घेतली जाईल.
राज्यातील महत्त्वाच्या 27 स्मारकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. त्या अनुषंगाने पीपीपी पद्धतीने स्मारकाच्या विकासाबरोबर त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपायोजना केल्या जातील अर्थसंकल्पात त्याकरिता तरतुदी करण्यात आले असल्याचेही पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.