बेळगाव लाईव्ह :माहिती हक्क अधिकार चौकशीला प्रतिसाद देताना नैऋत्य रेल्वेने (एसडब्ल्यूआर) रेल्वे क्र. 20661/20662 बेंगलोर -धारवाड -बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या चांचणीप्रसंगी उपस्थित झालेल्या ऑपरेशनल आणि टर्मिनल मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
तसेच बेळगावपर्यंत या रेल्वेची सेवा विस्तारित करायची असेल तर या मर्यादांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद केले आहे.
केएसआर बेंगलोर ते बेळगाव दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची बहुप्रतिक्षित चांचणी धाव गेल्या 21 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडली. अपवादात्मक गती आणि कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या रेल्वेने त्यादिवशी केएसआर बेंगलोर ते बेळगावपर्यंतचा आणि पुन्हा माघारी बेंगलोरपर्यंतचा आपला पहिला प्रवास कोणत्याही गुंतागुंतीविना यशस्वीरित्या पूर्ण केला.
त्यामुळे अद्यापपर्यंत वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत का सुरू झालेले नाही? असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. वंदे भारत रेल्वेच्या विलंबाला कांही घटक कारणीभूत असून ज्यापैकी कांही प्रामुख्याने बेळगाव रेल्वे स्थानकावरील या रेल्वेच्या देखभाली संदर्भातील आहेत.
थोडक्यात माहिती हक्क अधिकाराखाली मिळालेल्या उत्तरानुसार वंदे भारत एक्सप्रेससाठी बेळगाव रेल्वे स्थानकावरील ऑपरेशनल आणि टर्मिनल मर्यादा वाढविणे गरजेचे आहे.