बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विधिमंडळाचे गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेले हिवाळी अधिवेशन आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी आवरते घेण्यात आले. वकिलांवरील हिंसाचार नियंत्रण विधेयकासह अन्य विविध विधेयक मंजूर झालेल्या या अधिवेशन कालावधीत तब्बल 68 आंदोलने छेडण्यात आली आणि 17 निवेदनात सादर केली गेली.
बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे गेल्या 4 डिसेंबर पासून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच राज्यातील सर्व आमदार आणि अतिवरिष्ठ अधिकारीवर्ग बेळगाव शहरात अवतरला होता.
अधिवेशनात राज्यातील विविध समस्या आणि मुद्द्यांवर, विशेष करून शेवटच्या तीन दिवसात उत्तर कर्नाटकातील समस्या, योजना आदींवर चर्चा झाली. हे सर्व विधानसभेच्या सभागृहात घडत असताना दुसरीकडे सुवर्ण विधानसौध बाहेर कंत्राटदार संघटना शेतकरी संघटना शिक्षक संघटना, कंत्राटी कामगार संघटना, दलित संघटना वगैरे विविध संघटनांकडून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात होता.
बेळगावात होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा दर वेळेचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून यावेळीही आंदोलनकर्त्यांसाठी हालगा आणि कोंडसकोप्प येथे शामियाना उभारून आंदोलन स्थळांची निर्मिती करण्यात आली होती.
या दोन्ही ठिकाणी विविध संघटनांतर्फे एकूण 68 आंदोलन करण्यात आली. त्याचप्रमाणे सरकार दरबारी एकूण 17 निवेदने सादर करण्यात आली.