बेळगाव लाईव्ह:चिंचली गावातील दलित महिलेला फसविणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जावी. तसेच त्या महिलेच्या जमिनीचे 80 लाख रुपये तिला द्यावेत अथवा दिलेले 5 लाख रुपये परत घेऊन तिची जमीन परत करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे एका निवेदनाद्वारे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
आपल्या मागणीसाठी अन्यायग्रस्त दलित महिले समवेत कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने आज शुक्रवारी सुवर्ण विधानसौध येथील आंदोलन स्थळी धरणे आंदोलन छेडले. यावेळी चिंचली (ता. रायबाग) गावातील शोभा संजय माने या दलित महिलेवर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती असलेले निवेदन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या नावे सादर करण्यात आले.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना कंकणवाडी ग्रा. पं. सदस्य भिकाजी माहूरकर म्हणाले की रायबाग तालुक्यातील चिंचली गावातील शोभा संजय माने या दलित महिलेच्या मालकीची 5 एकर 20 गुंठे जमीन आहे. ही जमीन राजू बनगे याने 85 लाख रुपयांना खरेदी केली होती. शोभा यांचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असताना या राष्ट्रीयकृत बँकेऐवजी राजू बनगे याने बिडी येथील सोमेश्वर सोसायटीमध्ये 85 लाख रुपये जमा केले.
त्यानंतर त्या पैशांपैकी 1 लाख रुपये काढून पैशाची गरज असलेल्या शोभा यांना दिले आणि उरलेले 4 लाख रुपये शोभा यांच्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यात जमा केले. त्याचप्रमाणे शोभा यांना अंधारात ठेवून 80 लाख रुपये बनगे याने आपला मित्र रमेश पाटील या मित्राच्या खात्यावर जमा केले.
दरम्यान सर्व पैसे आपल्या खात्यावर जमा झाले आहेत असे समजून 80 लाखांची विचारणा करण्यासाठी सोसायटीत गेलेल्या शोभा यांना सोसायटीच्या व्यवस्थापकाने तुमच्या खात्यात पैसे नाहीत असे सांगून अपमानास्पद वागणूक देऊन माघारी धाडले. त्यानंतर आपल्या सोबत परिचयातील चार लोकांना घेऊन शोभा पुन्हा सोसायटीत गेल्या असता व्यवस्थापकाने नमते घेत तुमच्या खात्यावर 5 लाख रुपये जमा झाले होते. त्यापैकी 1 लाख रुपये तुम्हाला यापूर्वी काढून दिले आहेत आणि उर्वरित 4 लाख रुपये तुमच्या बडोदा बँकेतील खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
तसेच उर्वरित 80 लाख रुपये रमेश पाटील यांच्या नावाने कर्ज देण्यात आले असल्याचे लेखी लिहून दिले. तेंव्हा शोभा यांच्या नातलगाने रमेश पाटील याला गाठून पैशाबाबत जाब विचारात मारहाण केल्यामुळे त्याने कुडची पोलिसात तक्रार केली. एवढ्यावर न थांबता रमेश पाटील याने शोभा यांना गाव सोडून जा नाहीतर तुला ठार मारू असे धमकावले. त्यामुळे जीवाच्या भीतीने सध्या गाव सोडून त्या सांगली जिल्ह्यात राहत आहेत. आता त्या न्याय मिळावा यासाठी आमच्याकडे आल्या असता आम्ही पोलिसांच्या सहकार्याने 80 लाख रुपयांची विचारणा करण्यास गेलो असता आम्हाला त्या पैशांपैकी 50 लाख रुपये खर्च झाले आहेत.
पाहिजे असतील तर उर्वरित 30 लाख आम्ही देतो असे रमेश पाटील याने सांगितले. तसेच त्याकरिता दोन-तीन महिन्याचा अवधी मागून घेतला. दरम्यान रमेश पाटील यांच्या बायकोला आपल्या नवऱ्याकडे 80 लाख रुपये आहेत असे कळताच तिने कांही गुंडांना तयार करून त्या 80 लाखात आपला हिस्सा मागितला. एकंदरी या पद्धतीने शोभा यांना जमिनीचे संपूर्ण पैसे मिळालेले नाही. तेंव्हा एक तर आमचे 80 लाख रुपये आम्हाला द्यावेत अथवा दिलेले 5 लाख रुपये परत घेऊन आमची जमीन आम्हाला परत करावी, अशी आमची मागणी आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे हे धरणे आंदोलन सुरूच राहील भिकाजी माहूरकर यांनी शेवटी सांगितले.