बेळगाव लाईव्ह : शांततापूर्ण लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी परवानगी मागत आहोत. तुम्ही परवानगी दिली नाही तर आमचे आंदोलन होणारच आहे. याआधीही आम्ही महामेळाव्यातून आमचा निषेध नोंदवला आहे. तशाच प्रकारे यंदाही महामेळावा होणारच, असा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या सदस्यांनी पोलिस आयुक्तांना सांगितला. त्यानंतर सदस्यांची बैठक घेऊन मेळावा किंवा आंदोलन कसे करावे याबाबत चर्चा करण्यात आली.
कर्नाटकी विधीमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी आज (दि. 2) समिती नेत्यांची आयुक्तालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी, महामेळाव्यासाठी समितीने दिलेले पत्र आम्हाला मिळाले आहे, असे सांगून वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे आम्हाला महामेळाव्याला परवानगी देता येणार नाही, असे सांगितले. त्यावर समिती नेत्यांनी, 2006 पासून आम्ही महामेळावा आयोजित करत आलो आहोत. शांततेच्या मार्गाने आम्ही लढा देत असताना विनाकारण परवानगी नाकारण्यात येत आहे. पण, आम्ही ठरवल्याप्रमाणे निषेध नोंदवणार आहोत. तुम्हाला परवानगी देता येत नाही, असे आम्हाला लेखी कळवा, असे सांगितले.
यावेळी मध्यवर्ती सदस्यांनी महामेळाव्याला परवानगी देता येत नसेल तर सुवर्णसौधवर मोर्चा काढण्यात परवानगी द्या, अशी मागणी केली. त्यावर आयुक्त सिद्रामप्पा यांनी अशी परवानगी देता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर समिती नेते माघारी फिरले.
यावेळी मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, अॅड. एम. जी. पाटील, बी. ओ. येतोजी, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील यांच्यासह डीसीपी जगदीश रोहन, महालिंग नंदगावी, एसीपी नारायण बरमनी, अरूणकुमार कोळ्ळूर, निरिक्षक दिलीप निंबाळकर उपस्थित होते.
लेखी नसल्यामुळे पुन्हा बैठक
आज सकाळी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी मेळाव्याला परवानगी देण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यावर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात द्या, अशी मागणी समिती नेत्यांनी केली. आपण दोन तासात लेखी उत्तर पाठवतो, असे त्यांनी सांगितले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणतेही उत्तर न आल्याने समिती पदाधिकार्यांनी बैठक घेऊन समितीने महामेळाव्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता व्हॅक्सीन डेपो टिळकवाडी येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते रविवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता व्हॅक्सिन डेपो येथे जमावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.