बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2900 रुपयांचा पहिला हप्ता अदा करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पहिल्या पंधरा दिवसात कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम शनिवारी जमा करण्यात आली आहे त्यामुळे ऊस उत्पादकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यातील सहकारी तत्त्वावर एकमेव असलेला मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने यंदा तिसरा हंगाम सुरू केला आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने ठरविलेल्या दरापेक्षा अधिक दर देत मार्कंडेय कारखान्याने सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे.
शनिवारी कारखान्याच्या संचालक मंडळांनी बैठक घेऊन पहिल्या पंधरा दिवसात ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठविला आहे, त्या सर्वांच्या खात्यात 2900 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याबरोबरच वजनात पारदर्शकता आम्ही ठेवली आहे. पहिल्या पंधरा दिवसात ज्या शेतकऱ्यांनी ऊस पाठवला त्यांना आम्ही पहिला हप्ता दिला आहे. आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
गेल्या तीन वर्षापासून आम्ही मार्कंडे सहकारी साखर कारखाना यशस्वीरित्या चालवत आहोत. यंदाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एफ आर पी पेक्षा चांगला दर आम्ही शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी अधिकाधिक कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन तानाजी पाटील व्हाईस चेअरमन आर आय पाटील संचालक ज्योतिबा आंबोळकर, बाबासाहेब भेकणे, बाबुराव पिंगट, अविनाश पोतदार, सुनील अष्टेकर, शिवाजी कुट्रे, लक्ष्मण नाईक, चेतक कांबळे, बसवंत मायानाचे, सिद्धाप्पा टुमरी, बसवराज गाणीगेर, संचालिका वसुधा म्हाळोजी, वनिता अगसगेकर आदी उपस्थित होते.