बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्नीवीर योजनेअंतर्गत सांबरा येथील भारतीय हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूल (एटीएस) येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पुरुष व महिला अग्नीविरांचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी सकाळी दिमाखात पार पडला.
सांबरा येथील भारतीय हवाई दलाच्या परेड मैदानावर आयोजित या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, ट्रेनिंग कमांड आयएएफचे एअर मार्शल आर. राधीश उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे एअरमार्शल आर. राधीश यांनी परेडचे परीक्षण केले.
त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निविरांनी शिस्तबद्ध पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी आपल्या भाषणात एअरमार्शल राधीश यांनी प्रशिक्षणामुळे अग्निरांमध्ये आमुलाग्र परिवर्तन झाल्याचे झाल्याचे नमूद केले. आजचा दिवस हा हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
सदर सोहळ्यात प्रशिक्षण कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अग्निविरांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत सोहळा संपन्न होताच हर्षभरीत झालेल्या महिला अग्निविरांनी आपल्या टोप्या आकाशात उडवून आनंद प्रकट केला.
दीक्षांत सोहळ्यास निमंत्रित पाहुणे आणि भारतीय हवाई दलाच्या अधिकारीवर्गासह अग्निविरांचे कुटुंबीय -नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.