बेळगाव लाईव्ह विशेष:नववर्षी तोंडावर आले असून बहुतांश मंडळींना त्यांच्या आवडीच्या थर्टी फर्स्ट अर्थात 31 डिसेंबरचे वेध लागले आहेत. सारे जण पार्ट्यांचा बेत आखू लागले आहेत. बहुतांशजण शहराजवळील शेतामध्ये एकांत जागी, पर्यटन स्थळे, टेकडी, जंगल परिसर व निर्जन स्थळी जाऊन मौजमजा करत थर्टी फर्स्ट साजरा करतात.
शुक्रवारी रात्री सुरलच्या जंगलात बेळगावचे युवक हरवले होते वन विभागाने आणि स्थानिक लोकांनी त्या युवकांना शोधून काढले वन विभागाला चकणा देऊन ते युवक जंगलात सफरीसाठी गेले होते नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान ठेवूनच थर्टी फर्स्ट करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यातून वाढू लागली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना दारूच्या अंमलाखाली उत्साहाच्या भरात पर्यावरणाचे नुकसानही करतात. मात्र यंदा हा प्रकार टाळण्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचे भान ठेवूनच ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करावा, असे आवाहन पर्यावरणवादी संघटनांनी केले आहे.
अलीकडच्या काळात हॉटेल, रिसॉर्ट, क्लब, पब, डिस्कोथेक अशा ठिकाणी 31 डिसेंबर साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. तथापी सर्वांनाच ते शक्य नसल्यामुळे बहुतांश जण मोकळ्या आकाशाखाली नववर्षाचे स्वागत करण्यास प्राधान्य देतात शेत, मोकळे रान, जलस्त्रोतांचे ठिकाण जंगलालगतची जागा, रस्त्याकडेची खुली जागा अशा ठिकाणी साग्रसंगीत मेजवानीचा, वनभोजनाचा आनंद लुटला जातो. यासाठी अनेक जण दुपारपासूनच इच्छित स्थळी जाऊन तयारीला लागतात. कांही मंडळी दूरवरच्या ठिकाणी एक सहल आयोजित करून तिथेच दिवस व 31 डिसेंबरची रात्रही घालवतात. वनभोजन म्हटले की रानावनात चूल पेटवावी लागते. रात्रीपर्यंत राहायचे असेल तर शेकोटीही ओघाने येतेच.
मौजमजा करताना अनेकांना भान राहत नाही. चुल अथवा शेकोटीतील ज्वाळा वा इतस्ततः टाकलेले सिगारेटचे थोटूक अनर्थ घडू शकते याची कुणालाही कल्पना नसते. कारण ती ठिणगी जंगल व अख्खे माळरान पेटवायला कारणीभूत ठरू शकते. पश्चिम घाटात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे वनभोजनासाठी चुल वा तलफ भागविण्यासाठी सिगारेट पेटविण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘थर्टी फर्स्ट’ च्या नावाखाली मोठ-मोठ्या आवाजात गाणी लावून जंगल परिसरात घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे पशुपक्षी व वन्य प्राण्यांच्या दिनचर्येत व्यत्यय येतो. त्यातील कांही हिंस्र प्राणी बिथरू देखील शकतात. तसेच बहुतेक जण पार्टी संपल्यानंतर दारू, सोडा व पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, प्लेट्स व अन्य साहित्य तिथेच टाकून येतात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होण्यासह वन्य प्राण्यांनाही धोका निर्माण होतो. हाच प्रकार शहरातील चैनीबाज युवा वर्गाकडून शेतांमध्ये पार्टीचे आयोजन करण्याद्वारे केला जात असतो. शिल्लक अन्नासह प्लास्टिकचे ग्लास, बाटल्या, दारूच्या बाटल्या शिवारांमध्येच फेकून दिल्या जातात. काचेच्या बाटल्या फोडण्याचा प्रकारही केला जातो. आता 31 डिसेंबर रविवारी आल्यामुळे या प्रकारांना पेव फुटणार आहे. तथापि पार्ट्या करणाऱ्या युवकांनी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दरवर्षी 1 जानेवारी रोजी ठीकठिकाणी असे प्रकार पाहायला मिळतात, अर्थात सर्वच जण असे करतात असे देखील नाही. कांहीजण पर्यावरणाचे भान राखून नववर्ष स्वागताचा आनंद लुटतात. आता प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अध्यक्ष अभिजीत वाघमोडे यांनी जंगलांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असून ‘थर्टी फर्स्ट’च्या क्षणिक आनंदासाठी बहुमूल्य अशा पर्यावरणाला धोक्यात आणणे चुकीचे आहे. दरवर्षी रोप लागवड करून आपण जंगल तयार करू शकत नाही. तथापि शिल्लक जंगलांची जपणूक करून वर्तमान समृद्ध करणे एवढेच आपल्या हातात आहे, असे स्पष्ट केले आहे.