बेळगाव लाईव्ह :बेळगाव गोवा महामार्गावरील सुरल नजीकच्या फॉरेस्ट गेट जवळ वन विभागाला चकवून जंगलात शिरलेल्या बेळगाव येथील तरुणांना रात्रभर जंगलात भरकटत राहावे लागले. रस्ता चुकल्यामुळे भरकटलेल्या त्यांचा शोध लावण्याची वेळ वन आणि पोलीस खात्यावर आली. अखेर हिंसक प्राण्यांच्या पासून ते सुदैवानेच बचावले असून त्यांना वाचवण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि वनविभागाने मोठे प्रयत्न केले आहेत.
सध्या जांबोटी येथील चेक पोस्ट आणि पोलीस ठाण्यात त्यांना आणण्यात आले असून त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना सुखरूपपणे त्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. मात्र अनधिकृतपणे जंगलात शिरण्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगावच्या टिळकवाडी अनगोळ आणि वडगाव परिसरातील काही तरुण जंगल सफारीसाठी काल गेले होते. 31 डिसेंबर आणि वर्षाखेरीचा माहोल असल्यामुळे जंगलात जाऊन पार्टी करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र वनविभाग याला परवानगी देत नसल्यामुळे वन खात्याला चुकवून त्यांनी सुरल भागातून जंगलात प्रवेश केला मात्र तेथून परत कसे यायचे याची कल्पना न आल्यामुळे अखेर ते भरकटले गेले होते.
बेळगावच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच पोलीस खाते आणि वन खात्याला जागे करून रात्रभर त्यांचा शोध घेण्यात आला. पहाटेच्या सुमारास हे तरुण सापडले असून त्यांना जांबोटी येथे आणून ठेवण्यात आले आहे.
सध्या वर्षा अखेर आणि नवीन वर्षाचे स्वागत असा माहोल आहे. अशा वातावरणात जंगलात जाऊन पार्टी करण्याचे धाडस काही तरुण करतात. मात्र हिंसक प्राणी आणि इतर अनेक धोके असल्यामुळे अशा प्रकारचे धाडस पत्करून स्वतःच्या जीवावर उदार होऊ नये .असे आवाहन करण्याची वेळ सध्या आली आहे. पालकांनी आपली मुले पार्टीच्या निमित्ताने नेमकी कुठे जात आहेत याचा तपास लावून नेहमीच संपर्कात राहण्याची गरज आहे.
जंगलात भरकटलेल्या त्या तरुणांना सुखरूप परत आणण्यात काही प्रमाणात तंत्रज्ञान उपयोगी पडले आहे. त्यापैकी साऱ्या जणांचे फोन लागत नव्हते. मात्र एका व्यक्तीचा फोन लागल्यानंतर संबंधिताला लाईव्ह लोकेशन पाठवण्याची सूचना वन खात्याने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आणि त्या लाईव्ह लोकेशन च्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. तर अशा प्रकारचे धाडस कोणी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्या जंगलात भरकटलेल्या युवकांना शोधण्यात पारवाड गावच्या युवकांनी देखील मोलाचे योगदान दिले आहे. जंगलात हरवलेल्या युवकांपैकी एका युवकाचा मोबाईल रीच होत असल्याचे आरडा ओरड करून पहाटे चार वाजता संपर्क साधण्यात यश मिळवले. सर्व युवकांना वन खाते आणि पोलिसांनी सुरल चेक पोस्ट परिसरात ताब्यात घेतले असून नाते वाईकाना बोलावून दंड घातला जाणार आहे. युवक शोध मोहिमेत वन खाते अबकारी खाते आणि पोलिसांनीही कार्य केले आहे.