बेळगाव दि 29:केलेल्या कामांचे सुमारे 19 लाखांचे बिल देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या हुक्केरी पीडीओला निलंबित करण्याची मागणी करत ठेकेदाराने कुटुंबीयांसह बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर विषाची बाटली घेऊन धरणे आंदोलन केल्याची खळबळजनक घटना घडली.
सरकारच्या विविध योजनेंतर्गत विविध कामे आपण कंत्राट घेऊन दर्जेदारपणे पूर्ण केली आहेत. मात्र, जिल्हा, तालुका आणि ग्राम पंचायतीचे अधिकारी त्या कामांची बिले देत नसल्याचा आरोप करून ठेकेदाराच्या कुटुंबीयांनी विषाची बाटली हातात धरून आत्महत्येचा इशारा देत बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर आज आंदोलन केले. त्यामुळे एकच हायड्रामा झाला.
हुक्केरीच्या पीडीओना बिल मंजूर करण्यासाठी आपण आजवर लाखो रुपयांची लाच दिली. मात्र बिल मंजूर केले जात नाही, अधिकाऱ्यांना लाच देऊनही बिल दिले जात नाही. ही बाब जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिली, त्यांनी हुक्केरी तालुका पंचायत बैठकीत पीडीओला बिल देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र पीडीओ पुन्हा कमिशन देण्याची मागणी करून छळ करत असल्याचा आरोप ठेकेदार जयप्रकाश यांनी केला आहे.
आम्ही घर आणि मालमत्ता विकली आहे. कर्जदार घरी येत आहेत. त्यांच्या भीतीने त्यांनी तोंड लपवावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी नाराजी ठेकेदार जयप्रकाश यांच्या आईने व्यक्त केली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी ठेकेदाराचे निवेदन स्वीकारून बोलतांना ठेकेदार जयप्रकाश यांची मागणी तपासून पाहणार असल्याचे सांगितले.
ते 2015 पासून काम करत आहेत. त्यांनी मार्च महिन्यात एकदा येऊन निवेदन दिले आहे. कोणत्या कारणासाठी त्यांची बिले प्रलंबित आहेत याची पडताळणी करू, यात पीडीओची काही चूक असेल तर त्याच्यावर कारवाई करू असे त्यांनी सांगितले.
एकंदर, बिलासाठी लाचेची मागणी करून ठेकेदारांचा छळ करणाऱ्या पीडीओविरोधात आत्महत्येचा इशारा देत ठेकेदार जयप्रकाश व त्यांच्या कुटुंबियांच्या केलेल्या या आंदोलनामुळे बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर आज चांगलाच हायड्रामा झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता जिल्हा पंचायत संबंधित पीडीओवर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.