Friday, May 24, 2024

/

हलगेकर यांचा मराठी बाणा ‘सवदीना’ का खुपला?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : कर्नाटक विधान सभेत कन्नड भाषेला आदराचे स्थान देत खानापूर तालुक्यातील समस्या मराठीत मांडणाऱ्या आमदार विठ्ठल हलगेकर यांचा मराठी बाणा अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना खुपतो? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

बेळगावातील कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खानापूर तालुक्यातील समस्या हलगेकर यांनी तोडक्या मोडक्या कन्नड आणि मराठी भाषेत मांडल्या विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा जमेल तेवढ्या मराठी कन्नड मध्ये समस्या मांडा अश्या सूचना केल्या असताना नेहमी मराठी भाषिकांच्या विरोधात गरळ ओकणारे आमदार सवदी यांना मराठी द्वेष उफाळून आल्याचे दिसून आले.

मी कन्नड मध्ये बोलायला तयार आहे. परंतु त्याआधी माझ्या तालुक्याला आवश्यक सर्व योजना आणि सुविधा पुरवा. उगाच भाषेवरून राजकारण करू नका असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज विधानसभेमध्ये त्यांच्या मराठी भाषणाला आक्षेप घेणाऱ्या सदस्यांना परखडपणे सुनावले.

 belgaum

कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी सभापतींनी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडण्याची संधी दिली. त्यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सगळे नेते मराठीत बोलतात त्यावेळी आपल्याला मराठी हवे असते अशी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी सभापतींनी शक्य होईल तितके कन्नडमध्ये बोला अशी सूचना केली. तेंव्हा एका सदस्याने बेळगावमध्ये राहायचे असेल तर भाषेची हीच समस्या आहे अशी मधेच प्रतिक्रिया दिली. सभापती हलगेकर यांना समजावत असताना आमदार लक्ष्मण सवदी यांनी तावातावाने उठून बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी हलगेकर यांच्या मराठी भाषणाला आक्षेप घेतला तसेच हलगेकर यांना अतिशय चांगले कन्नड बोलता येते असे सभापतींना सांगितले. आमदार हलगेकर यांनी आपल्या भाषणात खानापूर तालुक्यात 70 टक्के लोक मराठी भाषिक असताना 314 शाळा असून त्यापैकी 206 मराठी शाळा आहेत. तेथे मुले मराठीतून शिकतात. तालुक्यातील सर्वांना कन्नडचा अभिमान आहे. असे असताना अंगणवाडी शिक्षकांना अटी का घालण्यात आला आहेत? याचे उत्तर सवदी यांनी द्यावे असे सांगून मराठी शाळांमध्ये मराठी भाषिक शिक्षकच नेमले जावेत अशी मागणी त्यांनी केली.Halgekar

हुबळी -धारवाडला आमच्या तालुक्यातून पाणी पुरवला जाते, मात्र त्यामुळे आमच्याकडे पिण्यासाठीही पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कळसा -भांडुरा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल असे सांगितले जाते. मात्र जोपर्यंत खानापूर तालुक्याला पुरेसे पाणी दिले जात नाही तोपर्यंत कळसा भांडुरा -प्रकल्प होऊ शकत नाही असे आमदार हलगेकर यांनी ठामपणे सांगितले. तसेच मी कन्नड मध्ये बोलायला तयार आहे. परंतु त्याआधी माझ्या तालुक्याला आवश्यक सर्व योजना आणि सुविधा पुरवा. उगाच भाषेवरून राजकारण करू नये असेही सुरुवातीला त्यांच्या मराठी बोलण्याला आक्षेप घेणाऱ्या नेतेमंडळींना हलगेकर यांनी अप्रत्यक्षरीत्या सुनावले. कळसा -भांडुरा पेक्षा काटगाळी येथे धरण बांधा आणि सर्व पाणी तुम्हीच घेऊन जा अशी सूचनाही त्यांनी केली. मलप्रभा नदीवर खानापूर तालुक्यात उपसा जलसिंचन योजना नाही. तालुक्यात एकही पाणीपुरवठा योजना नाही. त्याचप्रमाणे तालुक्यात 900 कि.मी. अंतराचे रस्ते आहेत. मात्र एकही रस्ता सुस्थितीत नाही. अशा अनेक समस्या खानापूर तालुक्याला भेडसावत आहेत. भीमगड अभयारण्यातील दुर्गम भागात गव्हाळी, गोंगळा वगैरे सारख्या गावांसाठी अद्यापपर्यंत रस्त्यांची सोय झालेली नाही, अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली.

आमदार हलगेकर यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत सभापतींनी खानापूर तालुक्यातील अंगणवाडीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या या सर्व समस्यांची नोंद घेतलेली आहे. सभागृहाचे सदस्य म्हणून तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली आहे असे सांगितले. सभापतींनी हलगेकर यांच्या कन्नड भाषणाची प्रशंसा करताना कन्नड येत नसतानाही कष्ट पडले तरी कन्नड भाषेत तुम्ही आपल्या भागाच्या समस्या मांडल्या आहेत. आता पुढील अधिवेशनापर्यंत चांगल्या कन्नडवर प्रभुत्व मिळवून त्या अधिवेशनात तुम्ही अभूतपूर्व भाषण केले पाहिजे अशा शुभेच्छा हलगेकर यांना दिल्या. त्यानंतर सभागृहाला उद्देश बोलताना सभापतींनी कन्नड भाषा वृद्धिंगत व्हायची असेल तर दुसऱ्या भाषेचा द्वेष करू नका, अशा कान पिचक्या उपस्थित सर्व सदस्यांना दिल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.