बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथील जिजामाता चौकातील अपघातामुळे मोडकळीस आलेल्या लोखंडी स्तंभाची महापौरांच्या आदेशावरून आज युद्धपातळीवर दुरुस्ती करून तो पुन्हा व्यवस्थित पूर्ववत उभा करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी बेळगाव लाईव्ह ने या समस्येकडे लक्ष वेधले होते. तातडीने त्याची दखल घेऊन काम सुरू झाले आहे.
जिजामाता चौक किल्ला, शिवाजी कंपौंड येथील स्तंभ अज्ञात वाहनाने पुन्हा ठोकरल्याने मोडकळीस आला होता. या संदर्भात वॉर्ड क्र.9 च्या नगरसेविका पूजा पाटील यांनी पुढाकार घेवून सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत पाटील यांच्या मदतीने स्तंभाच्या दुरुस्तीबाबत महापौरांना विनंती केली होती.
त्यांच्या विनंतीनुसार महापौर शोभा सोमणाचे यांनी आज सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांना तो स्तंभ तात्काळ दुरूस्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार जेसीबीच्या सहाय्याने कललेला स्तंभ व्यवस्थित सरळ उभा करून वेल्डिंगद्वारे मजबूत दुरुस्त करण्यात आला.
यावेळी महापौर शोभा सोमणाचे यांच्यासह वॉर्ड नं. 9 च्या नगरसेविका पूजा इंद्रजीत पाटील, रमेश मोदगेकर, राजु रेडेकर, उमेश तसीलदार, किरण मोदगेकर, महादेव लाड, तुकाराम भारती, सतिश सावंत, रवी पाटील, नंदू हुंदळेकर, मनपा अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सरकारचे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असल्यामुळे शहरात सुशोभीकरणाची कामे सुरू असताना दुसरीकडे या चौकातील स्तंभाची दुरवस्था झाली होती. जुन्या पी.बी. रोडवर असलेल्या जिजामाता चौकातील स्तंभ त्यापैकीच एक. हा स्तंभ बऱ्याचदा वाहन अपघातामुळे कोसळला.
गेल्या महिन्याभरापूर्वीच जिजामाता चौक येथील युवक मंडळ व लोकांनी स्वखर्चाने चौकातील स्तंभाची दुरुस्ती केली होती. मात्र आता पुन्हा अपघातामुळे हा स्तंभ कोसळण्याच्या स्थितीत उभा होता. तरी महापालिकेने या स्तंभाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तो चांगल्या मजबूत पद्धतीने पूर्ववत उभा करावा तसेच या ठिकाणच्या दुभाजकाची लांबी आणखी थोडी वाढवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी झाल्याने बेळगाव लाईव्ह ने यावर आवाज उठविला होता.