Sunday, October 6, 2024

/

अधिवेशनासाठी सुवर्ण विधानसौध होत आहे सुसज्ज

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणारे 10 दिवसाचे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असल्यामुळे बेळगाव सुवर्ण विधानसौध इमारत सुसज्ज केली जात असून सध्या स्वच्छतेचे आणि रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी सरकारच्या सूचनेनुसार सुवर्ण विधानसौध इमारतीच्या अंतर्गत भिंतीची रंगरंगोटी करण्याबरोबरच बाहेरील बाजूस आवश्यक असणारी सर्व ती सिद्धता केली जात आहे. त्यामुळे आज सुवर्णसौध येथे कामगारवर्ग रंगरंगोटी व स्वच्छतेच्या कामासह इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त असलेला पहावयास मिळाला.

कामगारांकडून पाईपद्वारे पाण्याची फवारणी करून सुवर्णसौधच्या फरशा पायऱ्या धुवून स्वच्छ केल्या जात होत्या. त्याचप्रमाणे तेथील बगीच्याची साफसफाई करण्याबरोबरच अंतर्गत रस्ते दुरुस्त करून त्यावर मुरूम पसरवण्यात येत होते.

येत्या दोन दिवसात विधानसभा आणि विधान परिषद सभागृहांची देखील साफसफाई करून ते लखलखित केले जाणार आहेत. याखेरीज सुवर्णसौध आवारात निर्माण केलेल्या हेलिपॅडपासून सुवर्णसौध इमारतीपर्यंत नव्या संपर्क रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे.

एकंदर हिवाळी अधिवेशनासाठी बेळगाव सुवर्ण विधानसौध इमारत आणि तिचा परिसर स्वच्छ झळझळीत करण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन विशेष परिश्रम घेत आहे.

दरम्यान, बेळगाव सुवर्ण विधानसौद येथील अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुवर्णसौध परिसरात आजपासून 30 डिसेंबरपर्यंत 144 कलमान्वये जमाबंदीचा आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस एन सिद्धरामप्पा यांनी दिली आहे.Suvarna soudha

हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या सुवर्ण विधानसौधच्या पूर्वेकडे 500 मीटर, पश्चिमेला राष्ट्रीय महामार्गावरील गार्डन हॉटेलपर्यंत 500 मीटर आणि दक्षिणेला टोयाटा शोरूमपर्यंत 500 मीटर अंतरापर्यंत येत्या 30 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. त्यामुळे या परिसरात चार पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास, सभा -समारंभ आयोजित करण्यास मनाई असणार आहे.

सदर क्षेत्रात कोणतीही अपायकारक वस्तू अथवा प्राणघातक शस्त्र स्वतः सोबत घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना फटाक्यांसारखी स्फोटक स्वतः सोबत घेऊन जाता येणार नाहीत. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या रस्त्यावर आंदोलन केल्यास, महामार्गावरील रहदारीस अडथळा आणल्यास विशेष करून रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.