बेळगाव लाईव्ह : बागायत खाते, जिल्हा पंचायत, जिल्हा फलोत्पादन खाते आणि ग्रामीण लघुउद्योग खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फल, पुष्प प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
शहरातील क्लब रोड येथील ह्युम पार्क येथे आजपासून येत्या रविवारी 10 डिसेंबर पर्यंत सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या आजच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, फलोत्पादन खाते बेळगावचे उपसंचालक महांतेश मुरगोड आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याबरोबरच स्मरणिकीचेही प्रकाशन करण्यात आले.
उद्घाटन समारंभ नंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते आणि प्रत्येक वेळी या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे.
या प्रदर्शनाद्वारे विविध फळाफुलांची माहिती त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी व सर्वसामान्यांना करून देण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी पडणारे हे प्रदर्शन आहे. शेतकऱ्यांना फलपुष्प बागायतीसंदर्भात हिडकल डॅम, खानापूर वगैरे ठिकाणी प्रशिक्षण हे दिले जात आहे सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे सांगून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकमंत्री जारकीहोळी यांनी बेळगाव ही कर्नाटकची दुसरी राजधानीच आहे. त्यासाठी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही असेही स्पष्ट केले.
फलोत्पादन खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांनी यावेळी बोलताना आपल्या खात्यातर्फे आयोजित फलपुष्प प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती दिली. तसेच शेतकरीवर्गासह सर्वांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उद्घाटनानंतर जिल्हा पालक मंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून माहिती घेतली. उद्घाटन समारंभास निमंत्रितांसह शेतकरी, नागरिक आणि शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सलग तीन दिवस आयोजित या फलपुष्प प्रदर्शनामध्ये विभिन्न प्रकारच्या 35 ऊन अधिक फळाफुलांची रोपटी त्यांच्या माहितीसह मांडण्यात आली असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.