बेळगाव लाईव्ह :50 इलेक्ट्रिक बस गाड्यांचा अंतर्भाव करण्याद्वारे बेळगाव शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्याची व्यापक योजना आखण्यात आली आहे.
यासाठी आवश्यक तयारी करून वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. भारत तशी शिफारस केली आहे. त्यानुसार येत्या तीन महिन्यात या अतिरिक्त बसेसचे बेळगाव शहरासाठी वितरण केले जाणार आहे.
सदर इलेक्ट्रिक बस गाड्यांच्या संचारासंदर्भात तपशीलवार आराखडा तयार करण्याची सूचना भारत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. वायव्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. भारत यांनी गेल्या सोमवारी बेळगाव विभागाला भेट देऊन सखोल पाहणी केली.
आपल्या या भेटीनिमित्त त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बस संचार सेवा आणि बेळगाव विभागातील सुरू असलेले प्रकल्प यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बेळगाव विभागातील कामाची पाहणी केल्यानंतर भारत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून आवश्यक सूचना केल्या. विशेष करून शक्ती योजना अंमलात आणताना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. या योजनेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले जावे.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी विशेष करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी घाई गडबडीच्या गर्दीच्या वेळी अतिरिक्त बस सेवेची व्यवस्था करण्याचे निर्देश भारत यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे बस संचार व्यवस्थेमध्ये स्वच्छता आणि कार्यक्षमता राखली जावी असे सांगून त्याकडे अधिक लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी एस. भारत यांनी एक निर्देश जारी करताना येत्या मार्च 2024 पर्यंत कित्तूर बस आगाराचे बांधकाम पूर्ण करण्याचा आदेश दिला. याच कालावधीपर्यंत खानापूरच्या नव्या बस स्थानकाचे बांधकाम देखील पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनीही दिले महामंडळाच्या भावी विकास योजनांबद्दल माहिती देताना येत्या दोन -तीन महिन्यात बेळगाव विभागाला 40 नव्या डिझेल बस गाड्या मिळतील असे भारत यांनी जाहीर केले. तसेच योग्य मार्गांवरील अतिरिक्त बस सेवेसाठी व्यापक कृती आराखडा तयार केला जाईल, असे भारती यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.