बेळगाव लाईव्ह :दुष्काळ आणि कर्जाच्या ओझ्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बेळगाव जिल्ह्यातील 56 शेतकऱ्यांसह राज्यातील एकूण 456 शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या माध्यमातून मृत्यूला कवटाळले आहे. धक्कादायक म्हणजे ही आकडेवारी लक्षात घेता राज्यात वरील कालावधीत दर दिवशी किमान शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने व्याजमाफी योजना राबविली असली तरी दुर्दैवाने परिस्थिती बदललेली नाही हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दुष्काळाने जवळपास संपूर्ण कर्नाटकाला विळखा घातलेला असताना सरकारने 236 पैकी 223 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. हावेर मध्ये सर्वाधिक 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्या मागोमाग 56 शेतकऱ्यांसह बेळगाव आणि 49 शेतकऱ्यांसह चिक्कमंगळूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नोंद झालेल्या 456 आत्महत्यांपैकी 354 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. नुकसान भरपाईच्या निकषानुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेतलेले असावे आणि आत्महत्येचे कारण थेट कर्जाशी संबंधित असावे.
संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांनी कर्जाची मूळ रक्कम परत केल्यास त्यांचे पिकांवरील कर्जाचे व्याज माफ केले जाईल अशी घोषणा नुकतीच केली आहे. शेतकऱ्यांनी सहकारी बँकांमधून काढलेली मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज नजरेसमोर ठेवून ही घोषणा करण्यात आली आहे.
योग्य दिशेने टाकण्यात आलेले हे पाऊल असले तरी यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांवरील कर्जाचे प्रचंडमध्ये कमी होण्यास मदत होते का? ते पाहावे लागेल.