Sunday, December 29, 2024

/

बेळगावातील 26, 27 डिसें. 1924 रोजीच्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्मृती…

 belgaum

बेळगाव लाईव्ह:महात्मा गांधीजी फक्त एकाच प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तो प्रसंग म्हणजे बेळगावमध्ये झालेले अधिवेशन होय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39 वे अधिवेशन महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी गांधीजींनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कलकत्ता कराराच्या ठराव मंजुरीवर आपले विचार व्यक्त केले होते.

काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या आयोजनासाठी प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट नियोजन आणि तयारी करण्यात आली होती. अधिवेशनासाठी व्हॅक्सिन डेपो ते लष्करी केंद्रापर्यंतचे प्रचंड क्षेत्र काँग्रेसने ताब्यात घेतले होते आणि अवाढव्य विहीर खोदण्यात आली होती. विहीर खोदाई चालू असताना त्यामध्ये पडून हर्पणहळ्ळी नामक एका लहान मुलाचा मृत्यू झाला. त्यावेळी गंगाधरराव देशपांडे दररोज घोड्यावरून विहीर खोदाईच्या कामावर लक्ष ठेवत.

खोदकामाच्या ठिकाणी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तो अशुभ संकेत असल्याचे मानणाऱ्या कामगारांना त्या विचारापासून परावृत्त करत देशपांडे यांनी विहीर खोदायचे काम सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर खोदकामापासून सुमारे अर्धा मैलावर असलेल्या आपल्या जलतरण तलावातील पाणी विहिरीकडे वळण्याची शक्यता लक्षात घेऊन लष्कराने देखील विहीर खोदाईस आक्षेप घेतला.

तेंव्हा गंगाधरराव देशपांडे यांनी काँग्रेसचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर विहीर पुरवत बुजवण्यात येईल असे आश्वासन दिले. ‘पंपा सरोवर’ नावाची ही विहीर अखेर बांधून पूर्ण झाली. ग्रॅनाईट दगडांचे बांधकाम असलेल्या या विहिरीला पाणी काढण्यासाठी दहा कमानी आणि कापलेले वापर बिंदू होते. पंपा सरोवरच्या निर्मितीसाठी त्या काळात 4370 रुपये आणि 3 आणे खर्चाला होता. तसेच पाईपलाईन्ससाठी 9293 रुपये आणि 3 पैसे खर्च करण्यात आले होते.

काँग्रेस अधिवेशन स्थळांनजीक ध्वजांकित रेल्वे स्थानक देखील बांधण्यात आले प्रभावी 70 फूट इतकी उंचीचे गोपूराकार प्रवेशद्वार असलेल्या या रेल्वे स्थानकाला हंपीच्या बलाढ्य सम्राटाच्या नावावरून ‘विजयनगर’ असे नांव देण्यात आले.

बेळगावातील काँग्रेसच्या या अधिवेशनाला देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातील सुमारे 17000 लोकांनी हजेरी लावली होती. पश्चिमेकडील क्वेट्टा ते पूर्वेकडील बर्मा, तसेच काश्मीर ते केरळपर्यंतचे जे लोक दाखल झाले त्यांची अधिवेशन स्थळ परिसरात जेवणखान आणि निवासाची सोय करण्यात आली होती. हे सर्व आनंदाने कृपापूर्वक केले गेले. अधिवेशनासाठी आलेल्यांच्या प्रत्येक सोयीसाठी स्वयंसेवक सज्ज होते.

अधिवेशन परिसर स्वच्छ निष्कलंक रहावा यासाठी स्वच्छता समितीकडून अतिशय प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. महात्मा गांधीजींना राहण्यासाठी खेमाजीराव गोडसे यांनी बांबू आणि गवताची एक लहान झोपडी तयार केली होती. सदर झोपडीसाठी 350 रुपये खर्च आला होता.

गांधीजींसारख्या साध्या राहणीच्या व्यक्तीसाठी तो खर्च खूपच महागडा असल्यामुळे त्यांनी त्या झोपडीला आक्षेप घेतला होता. स्वराज्य गट आणि कोणताही बदल नाही गट यांच्यात एकात्मता निर्माण करण्यासाठी काँग्रेस अधिवेशनाच्या सहा दिवस आधी गांधीजींचे बेळगाव आगमन झाले होते. 26 डिसेंबर 1924 रोजी बेळगावात दाखल झालेली प्रतिनिधी मंडळी काँग्रेस अधिवेशनासाठी उभारण्यात आलेला महाकाय शामियाना पाहून थक्क झाली होती. सर्कसच्या तंबूच्या आकाराच्या या शामियान्याचे भाडे 5000 रुपये इतके होते, शिवाय त्याचा आगी विरुद्ध 500 रुपयांचा विमा देखील उतरविण्यात आला होता. त्यावेळी गांधीजींनी सजावटीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाला आक्षेप घेतला होता. त्यांनी प्रतिनिधी शुल्क 10 रुपयांवरून 1 रुपया करावा अशी विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली. एवढे सर्व होऊन देखील बेळगावच्या अधिवेशनाने काँग्रेसला 773 रुपयांचा नफा मिळवून दिला. यापैकी 745 रुपये पीयुसीसी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आले तर उर्वरित 25 रुपये सचिवांसह आकस्मिकतेसाठी आणि 1 रुपया किरकोळ खर्चाचा निधी म्हणून खजिनदार एन. व्ही. हेरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. बेळगावातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 39 व्या अधिवेशनाने व्यक्तिमत्त्वांचा समूह पाहिला. या समूहाने स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आणि आपल्या देशावर वेगळा असा ठसा उमटवला.

त्यामध्ये महात्मा गांधी यांच्या व्यतिरिक्त मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय राजगोपालाचारी, डॉ. ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू, चित्तरंजन दास, पंडित मदन मोहन मालविया, सैफुद्दीन कीचालू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मोहम्मद अली, मौलाना शौकत अली, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, रंगास्वामी अय्यंगार वगैरे अनेक दिग्गजांचा समावेश होता.

-डाॅ. नितीन खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.