‘माझ्या गावची माझी शाळा मला तिचा लळा’ या उक्तीप्रमाणे हलगा गावच्या या शाळेच्या वयस्कर माजी विद्यार्थ्यांनी ज्यांनी शासकीय सेवा, व्यवसाय उद्योगातून निवृत्ती पत्करली आहे. जे अद्यापही मोठ्या पदावर कार्यरत आहेत, अशा सर्वांनी आपल्या शाळेची सुधारणा करून तिचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. शाळेतील वाचनालयाच्या माध्यमातून ते मुलांना मोफत संगणक शिक्षणही देत आहेत.
याव्यतिरिक्त यंदा शाळेला 140 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे रविवारी 3 डिसेंबर 2023 रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा हलगा या जवळपास दीडशे वर्ष गाठणाऱ्या शाळेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे अनेकांच्या मनात असलेल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या बालपणीच्या आठवणी ताज्या होणार आहेत . हलगा गाव हे बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मराठीचा दावा सांगणारे शेवटचे गाव आहे. तिथून पुढे कानडी मुलुख सुरू होतो. मराठीचा हा बालेकिल्ला अद्यापही अबाधित आहे हे या वर्धापन दिन सोहळ्याच्या आयोजनामधून अधोरेखित होत आहे.
वटत चाललेल्या झाडाला जशी नवपालवी फुटावी तशी बेळगावच्या पूर्व भागातील हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला नवचैतन्याची पालवी फुटली आहे. दिवसेंदिवस रोडावत चाललेली या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पुन्हा भरून आली असून झाडावरची पक्षांची किलबिल तसे शाळेतील वर्ग मुला मुलींच्या चिवचिवाटाने भरून जात आहेत.
या शाळेतून अनेक विद्यार्थी शिकले मोठे झाले, नावारूपाला आले तसे अनेक माजी विद्यार्थी आता ही शाळा वाचवण्यासाठी पुढे आले आहेत.
तथापि नव्या पिढीला अक्षराची ओळख सांगणारी ही शाळा त्याच दिमाखात 140 वर्षानंतरही उभीच आहे. अनेक पिढ्यांची अनेक स्थित्यंतर या शाळेने पाहिली आहेत. अनेक गोष्टी आपल्या हृदयात कोरून ठेवल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची नाव दिमाखात कपाळावर मिरवणारी ही शाळा आता पुन्हा बहरात आली आहे. त्यामुळे आजी-माजी विद्यार्थ्यांना सर्वांनाच अमोघ आनंदाची प्रचिती येत आहे.
हलगा सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचा नावलौकिक अलीकडे आणखी वाढत असून मागील वर्षी या शाळेत इयत्ता पहिली मध्ये 15 विद्यार्थी होते, त्यांची संख्या यावर्षी वाढवून 27 इतकी झाली आहे. 1883 साली स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेल्या या शाळेच्या यावर्षीच्या 140 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा समाज सुधारणा मंडळ व शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शाळा इमारतीची रंगरंगोटी करण्याबरोबरच क्रीडा साहित्याचे वाटप केले आहे.
याखेरीज सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व शाळा आवारात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्याबरोबरच इंटरनेटची सोय करून दिली जाणार आहे. एकंदर मराठा समाज सुधारणा मंडळ आणि माजी विद्यार्थ्यांकडून हलगा सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील मुलांना आधुनिक पद्धतीने जे कांही आवश्यक आहे ते सर्व उपलब्ध करून ही शाळा सुसज्ज केली जाणार आहे.
हलगा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचा 140 वा वर्धापन दिन माजी विद्यार्थी संघटना व शाळा सुधारणा समितीतर्फे येत्या रविवार दि 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता साजरा केला जाणार आहे. तालुका गट शिक्षणाधिकारी महिला बाल कल्याण मंत्री आणि विधान परिषद सदस्यांच्या उपस्थितीत प्रा. आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाने हा कार्यक्रम साजरा होणार आहे.
माझ्या पावलाच्या चिमुकल्या पाऊल खूना शोधण्यासाठी मी ज्या ज्या वेळी माझ्या शाळेत जातो त्या त्यावेळी तिथं माझं बालपण तिथेच एका कोपऱ्यात उभा असतं. मग्नपणे अनेक सवंगडी ज्यांच्या जगण्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत ते असतात माझ्या आजू बाजूला आपलेच बालपण शोधण्यासाठी आलेले. तोच वर्ग तोच फळा, तेच मैदानातील झाड, तोच पायाने उडणारा धुळा सगळ काही तेच असतं फक्त या शाळेने पंखात भरलेले बळ ताकत बनून जगभर सन्मानाने फिरवून आणत असते. आणि एक दिवस मीच इथ येतो शोधत माझे बालपण त्यावेळी बालपण शाळेच्या कोपऱ्यातचं उभा असते.
प्रकाश बेळगोजी
संपादक
Belgaum Live -बेळगाव लाईव्ह