बेळगाव लाईव्ह: महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या त्या वक्तव्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या वक्तव्याचा निषेध करत पत्रकारांनी मंत्र्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती पक्ष श्रेष्ठी विरोधात तक्रार करण्याचा ठराव पास केला होता त्यावर व्यक्त होताना मंत्री हेब्बाळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
बेळगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी कर्नाटक असोसिएशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमातील माझ्या भाषणामुळे बेळगावातील पत्रकार बांधव दुखावले गेले असतील तर मला माफ करा. मी तिथे इतर कोणत्याही हेतूने नाही तर सकारात्मक दृष्टीकोनातून बोललो असे त्यांनी म्हंटले आहे.
मी कोणाशीही भांडून राजकारण करण्याच्या मनस्थितीत नाही. सुरुवातीपासूनच माझे बेळगावच्या पत्रकार बांधवांशी चांगले संबंध होते. माझ्या आजवरच्या जडणघडणीत पत्रकार बांधवांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. पत्रकार बांधवांचा मी नेहमीच आदर करतो. त्यामुळे मी पत्रकारांची मने दुखावण्याचा प्रश्न कधीच येत नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.
हे प्रकरण लांबणीवर नेण्यापेक्षा ते असेच संपवूया. मी सध्या बंगलोरमध्ये आहे. आगामी काळात आपण परस्पर सहकार्याने जिल्ह्यात व राज्यात आणखी विकासकामे करू, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावर वक्तव्य करून त्या म्हणाल्या की, पत्रकारांनी राजकारणापेक्षा विकासावर अधिक प्रकाश टाकावा, या अर्थाने मी बोललो आहे. तो कार्यक्रम पत्रकारांच्या कुटुंबातील कार्यक्रम होता जनतेसाठी नव्हता. मी तुम्हा सर्वांशी एक बहीण म्हणून बोलले आहे. यामुळे पत्रकार बांधवांची मने दुखावली नसावीत. त्यामुळे कोणीही वेगळा विचार करू नये, अशी विनंती त्यांनी केली.