बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील गोवावेस अर्थात श्री बसवेश्वर सर्कल जवळ असलेला खाऊ कट्टा आणि नाल्याच्या बांधकामामध्ये झालेला गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात आज सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खाऊ कट्ट्याला भेट देऊन तेथील व्यावसायिक -दुकानदारांची चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू केल्यामुळे तेथील गाळेधारकांत एकच खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे बेंगलोर दक्षिणचे मुख्य अभियंता दुर्गाप्पा के. यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सोमवारी सकाळी गोवावेस येथील खाऊ कट्ट्याला भेट दिली. या भेटी प्रसंगी खाऊ कट्ट्याची पाहणी करण्याबरोबरच तेथील व्यावसायिक दुकानदारांच्या कागदपत्रांची तपासणी करून आवश्यक माहिती घेतली.
श्री बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथील खाऊ कट्ट्याचे बांधकाम नाल्यावर चुकीच्या अवैज्ञानिक पद्धतीने झाले आहे. तसेच नाल्याच्या जागी कोणतेही शासकीय बांधकाम करता येत नाही. त्यामुळे खाऊ कट्ट्याचे बांधकाम बेकायदेशीर आहे अशी तक्रार करण्यात होती. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक आज खाऊ कट्टा येथे आले होते.
याप्रसंगी युवा नेते राजू टोपण्णावर, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, मलगौडा पाटील आदी उपस्थित होते. खाऊ कट्टा येथील दुकानांचे वाटप गरीब गरजू लोकांना आणि दलितांना करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर येथील दुकान वाटपात अन्याय झाला आहे. खाऊ कट्टा दुकान वाटप प्रक्रिया कायद्याला धरून करण्यात आलेली नाही, अशा तक्रारीही होत्या. त्यावर देखील अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केली. खाऊ कट्टा येथील दुकानांचे वाटप केवळ भाजप कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे, अशी तक्रार देखील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली होती.
या पद्धतीच्या वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल येताना तज्ञ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज खाऊ कट्ट्याच्या चौकशीला प्रारंभ केला आहे.
खाऊ कट्ट्याच्या बांधकामाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराच्या पत्नीच्या नावे देखील खाऊ कट्टा येथे दुकाने आहेत. ती दुसऱ्यांना भाड्याने देण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्या निकषावर खाऊ कट्टा येथील दुकानांचे वाटप करण्यात आले आहे? असा जाब सामाजिक कार्यकर्ते राजू टोपण्णावर व सुजित मूळगुंद यांनी यावेळी विचारला. यासंदर्भातही अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सकाळी खाऊ कट्टा येथे आपल्या चौकशी प्रारंभ करताच तेथील गाळेधारक व्यावसायिक व दुकानदारांचे धाबे दणाणले होते. त्याचप्रमाणे बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, खाऊ कट्ट्याच्या ठिकाणी आजच्या कार्यवाही संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बेंगलोरचे मुख्य कार्यकारी अभियंता दुर्गाप्पा के. म्हणाले की, खाऊ कट्टा संदर्भातील तक्रारी व आरोपांच्या चौकशी संदर्भात सरकारने आमचे हे पथक या ठिकाणी धाडले आहे आम्ही सकाळपासून आमच्या कामाला लागलो असून खाऊ कट्ट्याची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात आली आहे. या ठिकाणच्या दुकान गाळ्यांचे वाटप व्यवस्थित झाले आहे की नाही? खाऊ कट्टा नाल्यावर बांधण्यात आला आहे का? आदी बाबींसंदर्भात चौकशी करण्याचा आदेश आम्हाला देण्यात आला आहे.
आम्ही सर्व चौकशी सुरू केली असून कागदपत्रांचीही पडताळणी करत आहोत. येथील गाळ्यांचे वाटप योग्य रीतीने झाले आहे की नाही? मागासवर्गीयांवर अन्याय झाला आहे का? हे सर्व पाहिले जाईल. आता या संदर्भात महापालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संबंधित कागदपत्रे मागवून घेतली जातील असे सांगून ती कागदपत्रे हाती येताच सखोल चौकशी व शहानिशा करून आठवड्याभरात आम्ही आमचा अहवाल सरकारला सादर करणार आहोत, असे मुख्य अभियंता दुर्गाप्पा के. यांनी स्पष्ट केले