belgaum

बेळगाव लाईव्ह :सोशल मीडियावरील समाजात अशांतता निर्माण करू शकणाऱ्या फेक न्यूजच्या बाबतीत पोलिसांनी सतर्क रहावे. खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्ये किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याचे आढळून आल्यास तात्काळ क्रम घेत संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अशी कडक सूचना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली.

बेळगाव दौऱ्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांनी आज सोमवारी सकाळी शहरातील पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. या भेटी प्रसंगी देऊन सोशल नेटवर्क मॉनिटरींग युनिट, कंट्रोल रुम्स वगैरेंची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सोशल मीडिया मॉनिटरिंग युनिटला भेट देऊन आक्षेपार्ह माहिती आणि फेक न्यूजवर केलेल्या कारवाईची त्यांनी माहिती घेतली.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्याची सूचनादेखील त्यांनी केली. यानंतर मंत्र्यांनी शहर नियंत्रण कक्ष व वायरलेस विभागाच्या कामकाजाचे आणि रेकॉर्ड रूमचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. नियंत्रण कक्षात येणारे कॉल आणि माहितीचे लॉग बुक तपासण्याबरोबरच प्रत्येक कागदपत्राची योग्य देखभाल करावी, असे निर्देश त्यांनी दिले. वाहतूक नियम भंगांच्या प्रकरणात दंड भरण्यासाठी सात दिवसांचा अवधी द्यावा, यानंतर कोर्टातून समन्स निघायला हवेत. दंड न Home minister किंवा न्यायालयात हजर न झाल्यास वाहन जप्त करण्यात यावे, असे निर्देशही गृहमंत्री परमेश्वर यांनी दिले. यावेळी त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारण्याची पद्धत, चलन काढण्याची पद्धत यांचा त्यांनी आढावा घेतला.

गृहमंत्री जी.परमेश्वर यांनी बेळगाव शहरातील विविध सर्कल आणि रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजचे निरीक्षण केले. सीसीटीव्हीचे निरीक्षण करणार्‍या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक कॅमेरा बसवलेल्या भागाची आणि रस्त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरही लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी विविध युनिट्सच्या कामकाजाची माहिती दिली. याशिवाय अधिवेशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कडक दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डीसीपी रोहन जगदीश यांनी शहरात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट, जातीय भावना भडकावणाऱ्या पोस्ट, प्रक्षोभक वक्तव्ये, घटना आढळल्यास आयटी कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल केला जातो, असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुडेद, नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे अधीक्षक डॉ. रवींद्र गडादी, बेळगाव शहर गुन्हे व वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा व पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.