बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात झेंडा चौक, मार्केट येथील महिलांसाठी असलेल्या पिंक टॉयलेटसाठी बोअरवेल अथवा पाईपलाईनद्वारे पाण्याची सोय करण्यात यावी, या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणी संदर्भात मध्यवर्तीय मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची काल भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
बेळगाव क्लबच्या ‘मैत्री’ या लेडीज विंगने शहरात ‘सुरक्षिता’ या महिलांसाठीच्या पिंक टॉयलेटची झेंडा चौक, मार्केट येथे उभारणी केली आहे. सदर टॉयलेट वर्षभरापूर्वी बांधण्यात आले असले तरी त्या ठिकाणी अद्यापपर्यंत पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.
त्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच महिला वर्गाची गैरसोय व कुचुंबना होत असते. याची दखल घेऊन मध्यवर्तीय मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल शनिवारी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि मनपा कायदा सल्लागार ॲड. महंतशेट्टी यांची भेट घेतली.
यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत विकास कलघटगी यांनी शहराच्या मुख्य बाजारपेठेत झेंडा चौक येथे महिलांसाठी असलेल्या पिंक टॉयलेटमध्ये पाण्याची सोय नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची माहिती दिली.
पाण्याची सोय व्हावी यासाठी सदर टॉयलेटच्या ठिकाणी यापूर्वी एकदा बोअरवेल मारण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र त्याला तेथील एका विशिष्ट गटाच्या लोकांकडून विरोध केला गेला. जाब विचारल्यास संबंधित जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगण्यात आले. परिणामी बोअरवेलचा पर्याय बारगळला. प्रत्यक्षात न्यायालयीन वाद हा त्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या म. ज्योतिबा फुले मंडई संदर्भात आहे. या मंडईच्या लिलाव प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
बोअरवेल खोदण्याच्या जागेशी त्याचा काहींही संबंध नाही, ही बाब देखील त्यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच याला मनपा कायदेशीर सल्लागार ॲड. महंतशेट्टी यांनी देखील दुजोरा दिला आहे. तेंव्हा सदर टॉयलेटच्या ठिकाणी तात्काळ पाण्याची सोय करावी, अशी विनंती विकास कलघटगी यांनी केली. यावेळी व्यापारी शिष्टमंडळाचे म्हणणे व मागणी पटल्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी पाण्याची समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे लागलीच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून झेंडा चौक येथील पिंक टॉयलेटसाठी तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना देखील केली. महापालिका आयुक्तांची भेट घेणाऱ्या मध्यवर्तीय मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळात रतन हणमशेठ, गिरीश बागी, अजित सिद्दणावर, उदयोन्मुख युवा व्यापारी शुभम कलघटगी आदी व्यापाऱ्यांचा समावेश होता.