बेळगाव लाईव्ह:अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या क्रिकेट विश्व करंडकाच्या रणसंग्रामाची अंतिम झुंज आज रविवारी रंगली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या अंतिम झुंजीचा आनंद लुटण्यासाठी रविवार असला तरी शहरवासीयांनी घरातच राहून हा सुपर संडे साजरा करणे पसंद केले आहे. परिणामी नेहमी गजबजलेली शहरातील बाजारपेठ व अंतर्गत रस्ते दुपारनंतर ओस पडून सर्वत्र सामसूम पहावयास मिळत होती.
अहमदाबादमध्ये आज रविवारी दुपारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्व करंडकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशवासी यांचे लक्ष सध्या या सामन्याकडे आणि भारताच्या विजयाकडे लागून राहिले आहे. याला बेळगाव शहर देखील अपवाद नाही. याचाच परिणाम म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही शहरातील विशेष करून बाजारपेठ व अंतर्भागातील रस्ते सामसूम दिसत होते.
बहुतांश शहरवासीयांनी विश्व करंडकाची अंतिम लढत पाहण्यासाठी आज दुपारनंतर घरातच राहणे पसंत केले होते. नागरिक नेहमीप्रमाणे घराबाहेर न पडल्यामुळे बाजारपेठ तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर जवळपास शुकशुकाट निर्माण होऊन अघोषित ‘कर्फ्यू’ सदृश्य चित्र पहावयास मिळत होते.
अत्यंत प्रतिष्ठेच्या क्रिकेट विश्व करंडकासाठी भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीचा आनंद सध्या कोट्यावधी भारतीयांप्रमाणे बेळगाववासिय देखील लुटत आहेत. प्रशासनाने तर सर्वांना अंतिम सामना पाहता यावा यासाठी सरदार्स मैदान आणि जिल्हा क्रीडांगण या ठिकाणी मोठ्या स्क्रीन उभारून सामन्याचे लाईव्ह प्रदर्शन सुरू केले आहे.
दुसरीकडे मोठमोठी हॉटेल्स, मॉल्स, व्यापारी आस्थापने या ठिकाण देखील विश्व करंडक अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रदर्शन केले जात आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी शेतीवाडीत, फार्म हाऊसमध्ये जाऊन मौजमजा करत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम लढतीचा आनंद लुटणे पसंत केले आहे.