बेळगाव लाईव्ह,:बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 14 चे कार्यतत्पर नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या प्रयत्नांमुळे पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जवळील गेल्या अनेक वर्षापासून रात्रीच्या वेळी अंधारात राहणाऱ्या हरिकाका कंपाउंड येथे पथदिपांची सोय करण्याचे काम सुरू झाल्यामुळे या परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जवळील शहराशी संलग्न असलेल्या हरिकाका कंपाउंडचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध व्यवसाय चालतात.
हरीकाका कंपाउंडमध्ये एकूण 120 बॉडिबिल्डिंग गॅरेजीससह लोहारी काम, रंग काम, वेल्डिंग काम, सुतार काम, वायरिंग काम असे अनेक व्यवसाय पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त येथे हार्डवेअर स्पेअरपार्टस, हॉटेल, कॅन्टीन, ट्रान्सस्पोर्ट ऑफिसीस आहेत. त्यामुळे अहोरात्र या ठिकाणी काम सुरू असते.
तथापि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्ट्रीट लॅम्प्स अर्थात पथदिपांची चांगली सोय नव्हती. त्यामुळे रात्री अंधारात असणाऱ्या हरिकाका कंपाउंड येथे रात्रपाळीचे काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती.
याची गांभीर्याने दखल घेत हरीकाका कंपाउंड येथे नव्या पथदिपांची सोय करण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक शिवाजी मडोळकर यांचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता.
नगरसेवक मडोळकर यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून हरीकाका कंपाउंड येथे पथदीप (स्ट्रीट लॅम्प्स) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामावर नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे आज जातीने लक्ष ठेवून होते. पथदिपांची सोय होणार असल्यामुळे येथील विविध व्यवसायांचे मालक आणि कामगार वर्गात समाधान व्यक्त होत असून ते नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांची प्रशंसा करून धन्यवाद देत आहेत. हरीकाका कंपाउंड येथे एकूण 25 स्ट्रीट लॅम्प्स बसविण्यात येणार आहेत.
त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात असलेले हरीकाका कंपाउंड आता रात्रीच्या वेळी उजळून निघणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या मालक व कामगारांची गैरसोय दूर होऊन चोराचिलटांचेही भय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.