बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द येथील सीमाप्रश्नासाठी त्यागाचा इतिहास असलेल्या निलजकर परिवारातील ग्रा. पं. अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व परशराम निलजकर यांनी आपल्या नातीच्या बारशानिमित्त आयोजित केलेला तब्बल 300 महिलांचा सामूहिक भजन कार्यक्रम गावात कौतुकाचा विषय झाला आहे.
आजच्या आधुनिक सुशिक्षीत समजल्या जाणाऱ्या समाजात मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडले जाते. तसेच बारशाला डीजे लावून आपल्या संस्कृतीला न शोभणारा धिंगाणा घातला जातो.
याला फाटा देत कंग्राळी खुर्द येथील निलजकर परिवारातील ग्रा. पं. अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व परशराम निलजकर यांनी आपल्या नातीच्या बारशानिमित्त बेळगांव तालुक्यातील 10 महिला भजनी मंडळाना आमंत्रित करून सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यत भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात तब्बल 300 महिलांनी एक सुरात सुरेल भजन गायन करून उपस्थित पै-पाहुण्यांची वाहव्वा मिळवण्याबरोबरच परिसर भक्तीमय केला होता. भजन गायनानंतर बारसे करून मुलीच्या नामककरण सोहळा पार पाडला. सामूहिक भजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सप्तस्वरानंद संगीत कला संस्थेने मोलाचे सहकार्य केले.
भजन कार्यक्रमाद्वारे नातीचे बारसे सगळ्या पद्धतीने साजरे केल्याबद्दल सप्तस्वरानंद संगीत कला संस्थशतर्फे श्री. व सौ. निलजकर दांपत्याचा गुरुवर्य शंकर पाटील व त्यांचा सहकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण घालून सत्कार करण्यात आला.
सीमा लढ्याचा इतिहास असलेल्या निलजकर परिवाराने बारशानिमित्त आयोजित केलेला उपरोक्त सामूहिक भजनाचा कार्यक्रम गावात कौतुकाचा विषय झाला आहे.