बेळगाव लाईव्ह:सर्व वाहनांवर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) अनिवार्य असणार असून त्या बसवून घेण्याच्या अंतिम मुदतीत आणखीन तीन महिन्यांनी म्हणजे येत्या 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वीची मुदत 17 नोव्हेंबर 2023 ही होती. वाढवण्यात आलेल्या अंतिम मुदतीची अधिकृत घोषणा सरकारकडून लवकरच केली जाईल, अशी माहिती वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली.
आतापर्यंत मर्यादित संख्येत एचएसआरपी बसवल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे यासंदर्भात सध्या न्यायालयीन प्रकरणे देखील सुरू आहेत. त्यामुळे वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या परिस्थितीत आम्ही अंतिम मुदतीत 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत आदेशासह अधिकृत घोषणा येत्या कांही दिवसात केली जाईल, असे ते म्हणाले.
यापूर्वी वाहतूक खात्याने राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सुमारे 2 कोटी वाहनांवर एचएसआरपी बसवणे अनिवार्य असल्याची घोषणा गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. तसेच एचएसआरपी बसवून घेण्यासाठी 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदत दिली होती.