बेळगाव लाईव्ह :बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा करण्यात यावी. अधिवेशन अर्थपूर्ण व्हावे, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी व्यक्त केली आहे.
होरट्टी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्र्यांना पत्र लिहून अपेक्षा व्यक्त केली आहे. बेळगाव येथे ४ डिसेंबर ते १० दिवस या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांबाबत चर्चा करण्यात यावी. समस्या सोडवाव्यात. आंदोलन, सत्याग्रह, उपोषण करण्यात अधिवेशनाचा बहुमोल वेळ वाया जात असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणारे अधिवेशन शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण पद्धतीने पार पाडावे, असे ते म्हणाले.
अधिवेशन काळात कृषी, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, महसूल यासह विविध विभागांशी संबंधित अनेक मागण्यांसाठी अनेक संघटनांकडून धरणे, सत्याग्रह, आंदोलने करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संबंधित संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
पत्रात होरट्टी यांनी मंत्र्यांना तसेच विविध संघटनांच्या नेत्यांना अधिवेशन काळात सुवर्ण विधानसौधबाहेर धरणे आणि सत्याग्रह न करण्याची सूचना केली आहे.
हिवाळी अधिवेशनकाळात होणाऱ्या आंदोलनांची संख्या कमी झाली आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सभागृहात अर्थपूर्ण आणि गांभीर्याने चर्चा होऊन, त्यावर तोडगा निघाल्यास उत्तर कर्नाटकात अधिवेशन घेतल्याचे सार्थकी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.