बेळगाव लाईव्ह:हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे शेत जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी शेत जमिनी त्वरित मंजूर कराव्यात. तसेच घरे गमावलेल्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे अन्यथा येत्या 1 डिसेंबरपासून आंदोलन छेडू अशा इशाऱ्याचे निवेदन संबंधित आपदग्रस्त शेतकऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे हुक्केरी तालुक्यातील बिरणहोळी, मनगुत्ती, इस्लामपूर, गुडगनट्,टी नवे वंटमोरी आदी गावातील शेतकऱ्यांची सुपीक शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.
कांही जणांची घरे पाण्याखाली गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी गेल्या 30 सप्टेंबर 1980 रोजी संबंधित शेतकऱ्यांना पर्यायी शेत जमीन व घरे गमावलेल्यांना पुनर्वसनासाठी जागा मंजूर केली आहे. मात्र गेल्या 43 वर्षात एकाही शेतकऱ्याला शेतजमिनीचे हक्कपत्र मिळालेले नाही किंवा घरे गमावलेल्यांपैकी एकाचेही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पुनर्वसन न झालेल्यांनी उघड्यावर संसार मांडला आहे. गेल्या 40 वर्षात अनेक सरकारी सत्तेवर आली, तथापि हुक्केरी तालुक्यातील या अपादग्रस्तांची दखल त्यांनी घेतलेली नाही,
आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद असून विद्यमान सरकारने तरी आम्हा आपदग्रस्तांची दखल घ्यावी अन्यथा येत्या 1 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासमवेत बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.