बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहराची लोकसंख्या १० लाखाच्या …….. वाहनांची संख्या अडीच ती तीन लाखांच्या घरात…..मात्र रहदारी नियंत्रणासाठी फक्त दोन पोलीस स्थानके व फक्त १५८ पोलीस अशी अवस्था बनली आहे. बेळगाव शहराचा विस्तार आणि रहदारी वाढत असताना रहदारी नियंत्रणासाठी आणखी दोन पोलीस स्थानके आणि किमान वाढीव २०० पोलिसांची गरज आहे. बेळगावात पोलीस आयुक्तालय स्थापून दहा वर्षे पूर्ण होत असताना शहराच्या रहदारीकडे कर्नाटकाचे गृहखाते गांभीर्याने लक्ष देत नाही. ही शोकांतिका आहे. चला पाहुयात या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बेळगाव शहराच्या रहदारी नियंत्रणाचे वाजलेले तीन तेरा…
बेळगाव हे शहर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमारेषेवर असलेले. स्थानिकांची वाहने वाढत असताना बाहेरून दररोज किमान एक लाख वाहनांची ये जा ठरलेली असते. असे असताना रहदारी नियंत्रणाचे नेहमीच बारा वाजलेले असतात. आजकाल महत्वाच्या ट्राफिक सिग्नलवर एकही पोलीस आढळत नाही. कधी कधी एकादा असतो, पण त्याची उपस्थिती तितकी प्रभावी ठरत नाही. मग हे रहदारी पोलीस जातात तरी कुठे असा प्रश्न आपल्याला पडणे नक्कीच स्वाभाविक आहे. असाच प्रश्न आम्हालाही पडला. आम्ही यावर शोध घ्यायचे ठरविले आणि आम्हाला मिळालेली माहिती धक्कादायक अशीच आहे.
कारभार फक्त १५८ पोलिसांवर !
बेळगाव पोलीस आयुक्तालयात उपलब्ध काही सूत्रांच्या हवाल्याने आम्ही बेळगावच्या रहदारी नियंत्रणाचा कारभार नेमका किती जणांवर आहे? याची माहिती मिळविली. आम्हाला धक्काच बसला. हा कारभार फक्त १५८ पोलिसांच्या हातात आहे. तो कसा ते पुढे पाहू. या रहदारी नियंत्रणाच्या कामात पहिले जबाबदारीचे काम येते ते पोलीस उपयुक्त अर्थात डीसीपी यांचे. या पदावर आहेत पी स्नेहा या आयपीएस अधिकारी. त्यांच्या खालोखाल येतात एकमेव सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात एसीपी गंगाधरय्या. या दोन अधिकाऱ्यांच्या हाताखाली दोन पोलीस स्थानके आहेत. एक बेळगाव नॉर्थ आणि दुसरे बेळगाव साऊथ.
बेळगाव नॉर्थ चा विचार केला तर तिथे मुख्य पदावर येतात पोलीस निरीक्षक अर्थात पीआय. या पदावर आहेत विशाल गाबि हे अधिकारी. यांच्या हाताखाली ३ पोलीस उपनिरीक्षक (पी एस आय), ८ सहायक पोलीस उपनिरीक्षक (ए एस आय ), २३ हेड कॉन्स्टेबल आणि ४५ कॉन्स्टेबल. बेळगाव साऊथ ला मुख्य पदावर पीआय अर्थात पोलीस निरीक्षक म्हणून विनायक बडिगेर हे अधिकारी आहेत. त्यांच्याही हाताखाली ३ पोलीस उपनिरीक्षक (पी एस आय), ८ सहायक पोलीस उपनिरीक्षक (ए एस आय ), २३ हेड कॉन्स्टेबल आणि ४५ कॉन्स्टेबल ही संख्या ठरलेली आहे.
दोन्ही पोलिसस्थानकांचे एकूण पोलीस ७८+७८ आणि त्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बेरीज केल्यास एकूण आकडा पोहोचतो १५८ वर. गोळाबेरीज झाली. आता पाहुयात या पोलिसांवर नेमक्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते.
जबाबदारीच्या ओझ्याखाली पोलीस
बेळगाव महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या शहराच्या दोन फोडी करून उत्तर आणि दक्षिण अशा क्षेत्रात वाटण्यात आल्या आणि शहरी व उपनगरी भागाच्या रहदारी नियंत्रणाची सेवा करण्याची जबाबदारी या १५८ पोलिसांवर देण्यात आली आहे. त्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात शहरातील सर्व सर्कल, महत्वाचे रस्ते, गजबजलेल्या बाजारपेठा, शाळा, कॉलेजीस आणि इस्पितळे हे सारे आले. आमची तक्रार असते की या आवश्यक ठिकाणी हवे असलेल्या वेळेला ट्राफिक पोलीस शोधून सापडत नाहीत. रस्ते कोंडले कि लोकांना त्यांची आठवण येते. मग कुठूनतरी शिटी वाजवत एकांदा पोलीस येतो हाच अनुभव. पुन्हा प्रश्न उभा राहतो हे पोलीस असतात तर कुठे? चला त्यांना शोधण्याचा प्रयत्न करूया….
बेळगाव शहर हे जिल्ह्याचे केंद्र आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अर्थात चन्नम्मा सर्कल पासूनच रोज जिल्ह्यातील एका ना दुसऱ्या संघटनेचे आंदोलन सुरु असते. त्यांचे मोर्चे, रास्ता रोको आंदोलने रोज असतात. हे सारे नियंत्रित करणारा पहिला घटक असतो तो रहदारी पोलीस. राजकीय व्यक्ती आल्या की त्यांच्या सभा, सभेचे पार्किंग, येणे, जाणे सारे रहदारी पोलिसांच्याच अंगावर. सण, वार, उत्सव, मिरवणूका या असताना तर काही ठराविक भागातच सर्वच्या सर्व पोलीस लावावे लागतात. त्यात रोजचे छोटे मोठे सरासरी २० अपघात ठरलेले. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकाला जिथे गरज आहे तिथे रहदारी पोलीस शोधून सापडत नाहीत.
भरीस भर म्हणून बेळगाव ते सुवर्णसौध आणि सांबरा विमानतळ या मार्गावर या पोलिसांना दिवसरात्र ड्युटी ठरलेलीच असते. हा भाग महानगरपालिका क्षेत्रात येत नसला तरी कमिशनरेट चे सदस्य म्हणून ड्युटी नाकारणे अवघड अशीच त्यांची अवस्था. यामुळे रहदारी पोलिसांना रजाच नाहीत. ते सुट्टी न घेता काम करीत आहेत. पण गरजेच्या ठिकाणी मिळत नाहीत, दिसत नाहीत. शेवटी माध्यमे आणि जनता दोघांच्याही रोषाचे शिकार ते बनत आहेत. नोकरीचा ताण आणि शिव्या एकत्र झेलत त्यांचा कारभार सुरु आहे.
गृह खाते जबाबदार
या समस्येला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला तर याला गृहखातेच जबाबदार आहे. हे आम्ही केलेल्या अभ्यासातून आलेले उत्तर आहे. बेळगाव शहराला गरज आहे वाढीव दोन रहदारी पोलीस स्थानके आणि अधिकारी धरून २०० पोलिसांची. पण आजवर कर्नाटकात आलेल्या सरकारांनी, गृहमंत्र्यांनी, राज्य पोलीस महासंचालकांनी, उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता विधानसभेचे अधिवेशन होईल. आणि जुंपले जातील रहदारी पोलीस सरकारी ड्युटीवर. तेंव्हा सामान्य नागरिकांचे काय होणार? जे दरवर्षी होते तेच होणार.
जर यावर्षी अधिवेशनापूर्वी बेळगावची रहदारी नियंत्रणासाठीची समस्या सोडवायची असेल, दोन वाढीव पोलीस स्थानके आणि वाढीव पोलीस मिळवून घ्यायचे असतील तर हा लेख वाचून शांत बसू नका. तो सरकार पर्यंत पोहोचू द्या. शेयर करा. आणि तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल तर मांडा तो कर्नाटकाच्या गृह मंत्रालयासमोर. बघूया उत्तर कर्नाटकाच्या विकासात ही बाब येते का? बेळगावची रहदारी मोकळा श्वास घेते का?
#trafficpolice #cop #RohanJagdish
#Dcpsnehapv #Belgavipolice