बेळगाव लाईव्ह:चांगले साहित्य निर्माण होण्यासाठी संवेदनशीलपणा गरजेचा असतो. आदर, प्रेम, भावना आणि आपुलकी ही साहित्यातून निर्माण होत असते. त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांची निरीक्षण वृत्ती महत्त्वाची असते, असे विचार लेखक, कथाकार, समीक्षक प्रा. डाॅ. डी. टी. पाटील यांनी व्यक्त केले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजीत 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन आज शनिवारी दुपारी रानकवी ना. धों. महानोर साहित्य नगरी (गोगटे रंगमंदिर) कॅम्प येथे उस्फुर्त प्रतिसादात पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष यानात्याने डाॅ. पाटील बोलत होते. साहित्य वाचनामुळे येणाऱ्या आचार विचारातून समाज घडत असतो. समाजाची जडणघडण साहित्य निर्मितीतूनच होत असते. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी प्रत्येकाने चांगल्या साहित्याचे वाचन केले पाहिजे, असेही प्रा. डॉ. डी टी पाटील म्हणाले. संमेलनाच्या प्रारंभी आज सकाळी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विद्यानिकेतन शाळेपासून संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या या सवाद्य ग्रंथदिंडीत बाल साहित्यिक व साहित्य प्रेमींचा मोठा सहभाग होता. ग्रंथदिंडीच्या सांगतेनंतर प्रमुख पाहुणे करसल्लागार एम. एन. राजगोळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुवर्य वीगो साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अरुण पाटणकर आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये वैभवी मोरे (बालवीर विद्यानिकेतन), मनाली बराटे (मराठी विद्यानिकेतन) शिवानंदनी धनाजी (मराठी शाळा मनगुत्ती), आकांक्षा पावशे (महिला विद्यालय), मधुरा मुरकुटे (महात्मा फुले विद्यालय कार्वे), समृद्धी पाटील (बालिका आदर्श) व अथर्व गुरव (मराठी विद्यानिकेतन) यांनी आपल्या कथांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. दुसऱ्या सत्रात शिवराज चव्हाण दिग्दर्शित ‘रानातल्या कविता’ हा रानकवी ना. धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सादरीकरण मराठी विद्यानिकेतनचे विद्यार्थी केले.9
तिसऱ्या सत्रात पार पडलेल्या कवी संमेलनामध्ये सुखदा पाटील, शिल्पा पाटील, समृद्धी पाटील, स्नेहल भाष्कळ, लावण्या सांबरेकर, तनिष्का गोमानाचे, तेजस्विनी चांदेकर, प्रथमेश चांदीलकर, श्रुती मोरे, लावण्या हुलजी व प्रिया जाधव यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कवी संमेलनानंतर दुपारच्या चौथ्या सत्रात कविवर्य द. रा. किल्लेकर स्मृती हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अखेर संमेलनाध्यक्ष प्रा. डाॅ. डी. टी. पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने संमेलनाची सांगता झाली. संमेलनास शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनीसह पालक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.