बेळगाव लाईव्ह :काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तीन मंत्री व एक खासदार यांना बेळगाव प्रवेश बंदीचा आदेश बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येऊ लागले आहेत. शिवसेनेचे (उद्धवजी ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काळा दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावला जावं असे आवाहन केले आहे.
एकंदर उद्या 1 नोव्हेंबर रोजी आचरणात घेणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह महाराष्ट्रातील राजकारण देखील तापू लागला आहे. एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना बेळगाव प्रश्नावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मुंबई येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला मी बेळगावच्या लढ्यात लाठ्याकाठ्या खाल्ल्या वगैरे अशी भाषा करत असतात. मी बेळगावच्या आंदोलनात तुरुंगात होतो. मग आता तुम्हाला बेळगावकरांचे दुःख समजत असेल तर त्यांनी सर्वप्रथम बेळगावला जाऊन काळ्या दिनामध्ये सामील व्हावे, असे आवाहन केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यानी बेळगाव मधला ‘बे’ देखील काढलेला नाही. सत्तेवर येताच ते बेळगावला विसरून गेले आहेत. कारण भारतीय जनता पक्षाची भूमिका वेगळी आहे, असे खासदार राऊत यांनी पुढे स्पष्ट केले.
बेळगावात काळ्या दिनाच्या कार्यक्रमास जाण्यास मंत्री दीपक केसरकर, शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांना 31 ऑक्टोबर सायंकाळी 6 पासून 2 नोव्हेंबर सकाळी 11 पर्यंत बेळगाव प्रवेशास बंदी घातली आहे.