बेळगाव लाईव्ह :अर्धांगवायू किंवा हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी तात्काळ आवश्यक असणारी अतिशय महागडी इंजेक्शनं सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला असून त्याबाबत अधिकृत आदेश येताच बेळगाव जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणे यांनी दिली आहे.
अर्धांगवायूमुळे शरीरातील रक्तवाहिन्या गोठल्या जाऊन कांही वेळा रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा (हार्ट अटॅक) झटका आलेल्या व्यक्तीला किमान 90 मिनिटांच्या आत आवश्यक उपचार न मिळाल्यास त्याच्या जीविताला धोका असतो.
अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णासाठी ‘आरटी प्लस’ हे इंजेक्शन तर हृदयविकाराचा झटका आलेल्यांसाठी ‘टेनेक्ट प्लस’ हे इंजेक्शन नवजीवन देणारे अत्यंत प्रभावी मानले जाते. आरटी प्लस इंजेक्शनची किंमत 60,000 रुपये तर टेनेक्ट प्लसची किंमत 40,000 रुपयांपर्यंत आहे.
यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना ऐनवेळी या इंजेक्शनसाठी पैसे जमा करणे अशक्य असते. तथापि यामुळे उपचारास विलंब होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
याचा विचार करून ही दोन्ही इंजेक्शनं यापुढे आरोग्य खात्यातर्फे सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्टेमी योजनेअंतर्गत ही इंजेक्शनने उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे एपीएल, बीपीएल असा कोणताच भेदभाव करण्यात येणार नसल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे आवश्यक इंजेक्शनची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.