बेळगाव लाईव्ह :सध्या सुगीचे दिवस सुरू असले तरी शेतकरी संतुष्ट, आनंदी नाही. कारण दरवर्षीपेक्षा पावसाने निराशाजनक हजेरी लावल्यामुळे बेळगाव सभोवतीचे भात पीक यंदा म्हणावे तसे आलेले नाही.
बासमती वगळता अन्य कोणतेच भात न आल्यामुळे नाराज शेतकऱ्यांकडून 20 टक्क्यांपेक्षाही कमी आलेल्या भात पिकाची सध्या कापणी सुरू झाली आहे.
विशेष करून बेळगावच्या पूर्व भागातील येळ्ळूर शिवार, वडगाव शिवार, हलगा शिवार, कुडची शिवार, अलारवाड शिवार याठिकाणी भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
मात्र यंदा वरूण राजाने अवकृपा केल्यामुळे बासमती वगळता या भागात घेतली जाणारी इंद्रायणी, सोनम, मनिला वगैरे शेकडो एकर भात पिकं मातीमोल झाली आहेत. त्यामुळे पेरणीसह भांगलण, खत मारणे, औषध फवारणी वगैरेंसाठी शेतकऱ्यांनी घेतलेली सर्व मेहनत वाया गेली आहे.
भात पीक घेण्यासाठी येणारा एकरी सुमारे 20-25 हजार रुपये खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान, कांही भागात बासमती भाताला अजूनही पोटरी येऊन दाणे भरू लागले असून काहींमध्ये दाणे भरायचे आहेत. मात्र या भाताव्यतिरिक्त इतर पेरणी केलेली भात पिकं पावसाअभावी वाळून सुकून गेली आहेत.
पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे उपरोक्त परिसरातील इंद्रायणी, सोनम, मनिला या भाताची पिकं नष्ट झाली असली तरी बळ्ळारी नाल्याला लागून असलेले बासमती पीक सुरक्षित राहिले आहे. सध्या तयार झालेल्या या भात पिकाची कापणी सुरू झाली आहे.