बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहर आणि परिसरात पतंग उडविण्याची हौस जीवघेणी ठरत आहे. गेल्या काही वर्षात पतंगबाजीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येत चालल्याच्या घटना वाढत आहेत. या साऱ्या गोष्टींसाठी केवळ पतंग नाही तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजा देखील जबाबदार ठरत आहे.
पतंगाच्या मांजामुळे जीवावर भेटण्याच्या घटनेत वाढ होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मांजा विक्रीवर बंदी घातली. परंतु आजही तरुणांकडून मांजाचा वापर राजरोसपणे सुरु आहे. कधी उड्डाणपूल, तर कधी झाडांच्या फांद्या तर कधी आणखी काय.. अनेक ठिकाणी मांजाची शिकार वाहनचालक तर कधी पादचारी ठरत आहेत.
शनिवारी बेळगाव शहरातील कपिलेश्वर उड्डाण पुलावर दुचाकी वरून जाणाऱ्या चंद्रकांत कोर्डेकर मांजामुळे दुखापत झाली असून या घटनेत त्यांचे नाव कापले आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी जखम त्यांना झाली नाही मात्र मांजा हा धोकादायक बनू लागला आहे.
पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मांजामुळे केवळ माणसेच नाही तर पक्षीदेखील मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय हा मांजा विघटित होत नसल्याने प्रदूषणाचेही कारण बनत चालले आहे. प्रशासनाने बंदी घालूनही अशा जीवघेण्या मांजाचा खेळ तरुणाईला का करायचा आहे? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. पतंग आणि पतंगाच्या मांजामुळे वाढत चाललेल्या अनुचित घटनांची जबाबदारी केवळ प्रशासनानेच नाही तर पतंग उडविणाऱ्या प्रत्येकाने, आणि पतंग उडविण्यासाठी आपल्या मुलांना पाठविणाऱ्या पालकांचीही आहे. अशा मांजामुळे होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी, पतंग उडविताना साध्या दोऱ्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपली हौस इतरांच्या जीवावर बेतेल, यात शंका नाही
ऐन दिवाळीमध्ये जीवघेण्या धोकादायक पतंगाच्या मांजाने अनेकजण जखमी होत आहेत सदर घटनांमुळे पतंगाच्या धोकादायक मांजाची समस्या ऐरणीवर आली असून प्रशासनाने मांजावर बंदी घालण्याबरोबरच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
मुळात सप्टेंबर महिन्यानंतर पतंग उडवण्याची परंपरा असते. पतंग उडवण्याच्या शर्यतीमध्ये एखाद्याच्या पटींगला काटशह देण्यासाठी धारदार मांजा दोऱ्याचा वापर केला जातो. बेळगाव शहरांमध्ये सर्रास सर्व ठिकाणी या मांजाचा वापर केला जातो. तथापि या धोकादायक मांजामुळे घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मांज्यावर बंदी आणावी. पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करून पतंगाचे मांजे जप्त करावेत अशी मागणी पुन्हा एकदा कपिलेश्वर ब्रीज वरील घटनेच्या निमित्ताने वाढू लागलेली आहे.
याव्यतिरिक्त कपिलेश्वर उड्डाणपूल असो गोगटे सर्कलचा रेल्वे उड्डाण पूल असो जुन्या पीबी रोडवरील उड्डाणपूल असो किंवा न्यू गांधीनगर ब्रिजवरील राष्ट्रीय महामार्ग असो या उंचावरील ठिकाणी मांजाने गळा कापला जाण्याचा धोका वाढला आहे. मागील काही वर्षात कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी कपलेश्वर उड्डान पुलावर 3 फुटाच्या अंतरावर दोन तारा बांधून हा ब्रिज सुरक्षित केला होता. तशा पद्धतीची उपायोजना जुना पी. बी. रोडवरील उड्डाणपूल आणि इतर ठिकाणी केली जावी अशी मागणी आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्गावर न्यू गांधीनगर ब्रिजपासून ते बुड ऑफिसपर्यंत जवळपास दीड ते दोन कि. मी.चा जो परिसर आहे तेथे बेळगाव शहरातल्या बाजूनी खाली पडणाऱ्या मांजाचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीने दोन तारा किंवा वायर बांधण्यात यावी अशीही मागणी आहे
पाच फुटाच्या अंतरावर एक किंवा सहा फुटाच्या अंतरावर एक अशा तारा जर बांधल्या खाली येणारा मांजा वरून निघून जाईल आणि त्याचा दुचाकीस्वारांना कोणताही त्रास होणार नाही. जोपर्यंत प्रशासन मांज्यावर बंदी आणत नाही तोपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी वरील प्रमाणे उपाय योजना करून जनतेची काळजी घ्यावी अशी मागणी या निमित्ताने वाढू लागलेली आहे.