बेळगाव लाईव्ह विशेष:कलेचे माहेरघर असलेल्या बेळगावने चित्रपट व नाट्य क्षेत्राला अनेक दर्जेदार कलाकार दिले आहेत त्यामध्ये आता मच्छे, बेळगाव येथील प्रशांत पाटील या युवकाची भर पडली असून जो सध्या चित्रपटांसाठी लाईन प्रोड्युसरची भूमिका समर्थपणे पार पाडत आहे.
बेळगाव सारख्या छोट्याशा शहरांमधून चित्रपट क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्या युवकांची संख्या खूपच कमी आहे. मात्र मच्छे, बेळगाव येथील प्रशांत पाटील या युवकाने आपल्यातील कौशल्याच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात आपले पाय रोण्यास सुरुवात केली आहे. प्रशांत याने लाईन प्रोड्यूसर म्हणून आजवर 16 चित्रपटांसाठी काम केले आहे. प्रशांतचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे मच्छे सरकारी प्राथमिक शाळेमध्ये आणि दहावीपर्यंतचे शिक्षण व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे झाले आहे. पुढे ज्योती महाविद्यालयामध्ये पदवी पूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीबीएचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशांतने शेख कॉलेजमधून एमबीए ही पदवी संपादन केली.
नाटकाच्या माध्यमातून प्रशांतमध्ये लाईन प्रोड्यूसर बनवण्याची आवड निर्माण झाली. या क्षेत्रात प्रवेश करण्याची पहिली संधी आपल्याला 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या जोगवा या चित्रपटाद्वारे मिळाल्याचे त्याने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. सौंदत्ती परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मी लाईन प्रोड्यूसर या क्षेत्रात पदार्पण केले. आजपर्यंत मी सुमारे 32 चित्रपटांसाठी काम केले असले तरी हरहर महादेव, पावनखिंड, तू ही रे, हम्पी कॅरी, ऑन मराठा, देऊळ बंद, हिंदीमध्ये पद्मावत अशा विविध 16 चित्रपटांसाठी मी प्रामुख्याने लाईन प्रोड्यूसर म्हणून काम पाहिले आहे. लाईन प्रोड्यूसर हा चित्रपट क्षेत्रातील एक हुद्दा असून प्रोडक्शन असिस्टंटपासून सुरुवात करून आज मी या मुद्यावर येऊन पोहोचलो आहे, अशी माहिती त्यांने दिली.
मराठी व्यतिरिक्त मी हिंदी, तेलुगू, मल्याळम चित्रपटांसह हॉलीवूडच्या एका चित्रपटासाठी देखील लाईन प्रोड्यूसर म्हणून काम पाहिले आहे. लाईन प्रोड्युसरचे नेमके काम काय असते आणि हा हुद्दा प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं? या प्रश्नाला उत्तर देताना चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते समाप्तीपर्यंत लाईन प्रोड्युसरला काम करावे लागते. या कामांमध्ये संपूर्ण व्यवस्थापन येतं म्हणजे लोकेशन्स आणि कलाकारापासून चित्रपटाच्या कथेला जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. थोडक्यात चित्रपट तयार होऊन प्रदर्शित होईपर्यंत लाईन प्रोड्युसरला काम करावं लागते, असे प्रशांतने सांगितले.
लाईन प्रोड्यूसर म्हणून आता कोण कोणते चित्रपट तुझ्याकडे आहेत आणि बेळगावात कोणत्या चित्रपटांचे चित्रीकरण झालं आहे? या प्रश्नाला उत्तर देताना लाईन प्रोडूसर म्हणून मी काम पाहिलेल्या चित्रपटांपैकी शॉर्ट अँड स्वीट, धोंडी झंप्या, कॅरी ऑन मराठा या चित्रपटांचे चित्रीकरण बेळगावमध्ये झाले आहे. यापैकी ‘शॉर्ट अँड स्वीट’ या बेळगावात चित्रीकरण झालेल्या चित्रपटाचे संपूर्ण लाईन प्रोड्युसर मी केले असून येत्या 3 नोव्हेंबर 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगावमध्ये झाले आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत असून त्या व्यतिरिक्त रसिका सुनील, हास्यजत्रा फेम ओंकार भोजने आदी कलाकार या चित्रपटात आहेत.
या खेरीज बेळगावचे कलाकार, ढोल पथकही आहे. सदर चित्रपटात बेळगावपासून पुण्यापर्यंतचे नाते दाखविण्यात आले आहे. हा चित्रपटात वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यावर आधारित आहे. बापाचे आणि मुलाचे पटत नसेल तर त्याचे घरावर कसे परिणाम होतात हे दाखवणारा एक कौटुंबिक विनोदी असा हा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश कदम यांनी तर छायाचित्रीकरण राहुल जाधव यांनी केले आहे. शॉर्ट अँड स्वीट चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव शहर परिसरात झाले आहे. कॅम्प येथील डाॅ. पटेल यांचे घर, शाहूनगर येथील जॉन यांचे घर, रामदुर्गचा तोरगल किल्ला वगैरे ठिकाणांसह लिंगराज महाविद्यालयांमध्ये या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.
चित्रपटात बेळगावचा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग दाखविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक, राणी कित्तूर चन्नम्मा चौक, छ. शिवाजी उद्यान आदी ठिकाणी देखील या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असल्याची माहिती प्रशांत पाटील याने दिली. चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या बेळगावच्या युवकांसाठी तुझा काय संदेश असेल? या प्रश्नाला उत्तर देताना चित्रपट क्षेत्रात लगेचच यश मिळत नाही त्यासाठी थोडाफार संघर्ष हा करावाच लागतो आणि त्याकरिता संयम खूप महत्त्वाचा असतो. या खेरीज योग्य मार्गाचा अवलंब करणे गरजेचे असते. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात येण्याचा निर्धार करणाऱ्या युवकांनी कितीही अडचणी आल्या तरी आपल्या निर्धारापासून ढळू नये. कारण प्रयत्न करत राहिल्यास आपल्याला एक ना एक दिवस यश हे मिळतच असे प्रशांत पाटील यांनी सांगितले.