बेळगाव लाईव्ह विशेष :राष्ट्रीय पक्षातील मराठा समाजातील नेत्यांनी आपला आत्मसन्मान गहाण ठेऊ नये ,त्याचबरोबर मराठा समाजाचे अस्तित्व कसे महत्वपूर्ण आहे हे अधोरेखित केले पाहिजे असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
बेळगाव मनपात भाजप मधील मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या आसरा घेण्यासाठी चालवलेल्या प्रयत्ना बद्दल ते बेळगाव लाईव्ह शी बोलत होते.
रिंगरोड बायपास किंवा सुपीक जमिनींचे भू संपादन यामध्ये बहुतांशी बेळगाव परिसरातील मराठा समाज उध्वस्त होत असताना भाजपने कधीही मराठा समाजाच्या जमिनी वाचवण्याचे काम केले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून मराठा समाजाच्या मागे दडण्याचे काम तुम्ही करत आहात.मराठा समाजाला सोबत घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने नेहमीच मराठा समाजाचे अस्तित्व टिकवले आहे, उलट भाजप, काँग्रसने मराठा समाजाला दुर्लक्षितच केले आहे असा आरोप त्यांनी केला.
मराठा समाजाची भाषा मराठी असून ती टिकवणे मराठा समाजाची सांस्कृतिक गरज आहे. राष्ट्रीय पक्षातील मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठी शाळा, मराठी भाषा ,मराठी संस्कृती यांचा प्रश्न अग्रक्रमाने आपल्या पक्षात लाऊन धरला पाहिजे. केवळ सतरंजी उचलणारा कार्यकर्ता म्हणून मराठा समाजाची ओळख असता कामा नये ,त्याचबरोबर जर तुम्ही सत्तेत असाल तर मराठा समाजातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न,त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा ,समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तरच मराठा समाजाचे घटक असल्याचा तुम्हाला नैतिक अधिकार प्राप्त होतो. केवळ स्वतः वर संकट आले तर समाजाचा स्वसंरक्षणार्थ वापर करणे हे करंटे पणाचे लक्षण आहे असेही त्यांनी नमूद केले.
छ्त्रपती शिवरायांचा ज्यावेळी अवमान झाला त्यावेळी पक्षीय राजकरण सोडून रस्त्यावर उतरण्याची गरज या नेत्यांकडून होती पण केवळ रमाकांत कोंडूस्कर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होते. त्याच बरोबर बेळगाव रेल्वे स्थानकावर छ्त्रपती शिवरायांचे शिल्प बसवण्यासाठी परत एकदा समितीच आग्रही भूमिका घेताना दिसत होती. येळळूर मधील मराठा बांधवांवर अमानुष लाठी हल्ला झाला त्यावेळी त्या मराठी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी कोणताही पक्षीय नेता जाताना दिसला नाही असेही ते म्हणाले.
मराठा ही केवळ जात नसून जगण्याची रीत आहे हे पक्षीय मराठा बांधवांनी शिकण्याची गरज आहे ज्यावेळी समाजावर संकटे येतात त्यावेळी समाज घटक म्हणून तुम्ही पुढे आला तरच… तुम्ही मराठा समाजावर बोलण्याचा नैतिक अधिकार प्राप्त करू शकता. ‘मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही शिवरायांची शिकवण म्हणजे आमचे ब्रह्म वाक्य आहे त्याला पाईक होण्याचे तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत.