बेळगाव लाईव्ह विशेष:महापालिकेत कारणे दाखवा नोटीस आल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटाकडून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजपकडून मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न सुरू असून याविरोधात विरोधी गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात जातीची फोडणी देण्याचा प्रयत्न होत आहे.
मराठी माणसावर अन्याय होताना संजय बेळगावकर तुम्ही कुठे होता? -कोंडुसकर
जिल्हा पालक मंत्र्यांनी मराठा समाजाला त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करणारे बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर बेळगावमध्ये आजपर्यंत मराठी माणसांवरील अन्यायविरुद्ध जेव्हा आंदोलन होतात होती तेव्हा मराठी माणूस म्हणून कुठे गेले होते? असा परखड जाब विचारत मराठा समाजाचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांनी बेळगावकर यांना मराठा समाजाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरला नसल्याचे जणू स्पष्ट केले आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून मराठा समाजाला, त्यांच्या नेत्यांना त्रास दिला जात असून याचा मराठा समाजाने गांभीर्याने विचार करावा अशा आशयाचे आवाहन बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. यासंदर्भात रमाकांत कोंडुसकर बेळगाव लाईव्हशी बोलत होते. ते म्हणाले की, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मराठा समाजाला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला आहे. तथापि संजय बेळगावकर यांना मला विनंती करावीशी वाटते की तुम्ही बुडाचे अध्यक्ष असताना तुमच्याच निधीतून शिवसृष्टीची निर्मिती झाली. मात्र शिवसृष्टीची निर्मिती केल्यानंतर ती जनतेसाठी खुली करण्याऐवजी छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अडगळीत टाकण्यात आलं. महाराजांना त्या ठिकाणी जवळजवळ 6 वर्षे कोंडण्यात आले. या शिवसृष्टीचे दोन वेळा उद्घाटनही झाले, मात्र त्याबरोबरच शिवरायांचा अवमान देखील केला गेला. तसेच शिवसृष्टीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मराठा समाजाचे नेते किंवा बुडाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला साधे निमंत्रितही करण्यात आले नव्हते. हा सर्वप्रथम मराठा समाजाचा सर्वात मोठा अपमान आहे असं मला वाटतं. ज्यावेळी राजधानी बेंगलोर सारख्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्यांचा अवमान झाला. या घटनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या बेळगावातील शिवभक्त युवकांना कारागृहात डांबण्यात आला. त्यावेळी राज्यात भाजपचं सरकार होतं आणि शहराचे दोन्ही आमदार देखील भाजपचे होते. थोडक्यात हिंदुत्वाचे सरकार होते. शिवरायांच्या नावावर मतांची भीक मागणारे त्यांचा अपमान होत असताना मात्र तुमच्या सकट तुमचे सर्व नेते मूग गिळून गप्प बसले होते. हा मराठा समाजाचा अपमान नव्हे काय? असं मला तुम्हाला सांगावसं वाटतं.
तुम्ही बुडाचे अध्यक्ष असताना प्रीतम नसलापुरे हे बुडा आयुक्त होते. त्यावेळी तुमच्या कारकिर्दीमध्ये 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे विद्यमान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे म्हणणे आहे. जर खरोखर हा भ्रष्टाचार झालेला असल्यास एक तर तुम्ही त्यामध्ये सहभागी असलं पाहिजे किंवा मराठी माणूस म्हणून तुम्हाला या भ्रष्टाचारात अडकवण्याचं काम ज्या दक्षिणचे आमदारांना तुम्हाला बुडा चेअरमन केलं त्याच्याकडून होऊ शकतं. किंबहुना मराठी माणूस म्हणून तुम्हाला त्याने त्रास देण्याचे काम केलेला आहे असे मला वाटते. अवलोकन केल्यास यापूर्वी मराठा समाजाचे बाळासाहेब कंग्राळकर हे बुडाचे अध्यक्ष होते. मात्र ते किती लवकर स्वर्गवासी झाले आणि का स्वर्गवासी झाले? याचीही संजय बेळगावकर यांनी शहानिशा करावी, असे कोंडुस्कर म्हणाले
संजय बेळगावकर यांचे जर येथील मराठा समाजावर खरोखर प्रेम असेल तर कणबर्गी सारख्या ठिकाणी माझ्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन तुमच्याच बुडाने संपादित केली आहे. त्या शेतकऱ्यांबद्दल त्यांनी कधी विचारविनिमय केला नाही. नष्ट होणाऱ्या त्यांच्या सुपीक शेतीचा त्यांनी विचार केला नाही. ते जर खरोखर मराठी असतील तर बेळगाव शहराच्या रिंग रोडच्या माध्यमातून जवळपास 1372 एकर मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे त्याबद्दल त्यांनी कधी अवाक्षरही काढले नाही किंवा आंदोलनातही सहभागी झाले नाहीत. त्याचप्रमाणे हलगा -मच्छे बायपास रस्त्यामध्ये मराठा समाजाची जवळपास 600 -700 एकर सुपीक शेत जमीन जात आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाचे नेते म्हणून ते कधीही आलेलं मला दिसलेले नाही. त्यांचे दक्षिणचे आमदार मराठा समाजाला पुढे करून आपण हिंदुत्वाच्या पाठीशी आहे असे दाखवून मराठी समाजाच्या निरपराध मुलांवर नाहक गुन्हे दाखल करण्याचं काम करत आहेत. त्यावेळी बेळगावकरांनी कधी त्यांना जाब विचारल्याचे निदर्शनास आलेले नाही. ते जर खरोखर मराठी -मराठा प्रेमी असतील तर बेळगाव दक्षिणच्या आमदाराकडून मराठी युवकांचे कामधंदे बंद पडण्याचे जे उद्योग बऱ्याच वर्षापासून सुरू आहेत त्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवावा.
संजय बेळगावकर यांनी यापूर्वी कधीही तोंड उघडले नव्हते. तेंव्हा मला विनंती करावीशी वाटते की खरोखर त्यांना मराठा समाजाबद्दल इतकं प्रेम आहे तर मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध जेंव्हा आंदोलन होतात तेंव्हा मराठी माणूस म्हणून ते तेव्हा कुठे गेलेले असतात. आजतागायत बेळगावकर कधीही मराठी माणूस मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरलेले नाहीत.
बेळगावच्या महापौरांच्या बाबतीत देखील एक वक्तव्य करताना त्यांना त्रास देण्याचं काम जिल्हा पालकमंत्री करत असल्याचा आरोप संजय बेळगावकर यांनी केला आहे. मात्र याबाबतीत देखील मला सांगाव सारखं वाटतं की 138 कामगारांना नोकरीत कायम करण्यासाठी त्या ठिकाणी 50 -60 लाखाचा भ्रष्टाचार होतो. महापौरांनी स्वाक्षरी केलेली फाईल महापालिकेतील गायब होते आणि दक्षिणच्या आमदारासह सभागृहातील सर्व लोकप्रतिनिधी या प्रकरणी कारवाईची मागणी करतात. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी अशी दक्षिणच्या आमदारांचे म्हणणे आहे. कारण यामध्ये आपले काहींच न बिघडता मराठी भाषिक महापौर मॅडम अडकणार हे त्यांना चांगलेच माहित आहे. थोडक्यात एका मराठी महिला महापौरांना निष्कारण या प्रकरणात अडकवण्याचं काम बेळगाव दक्षिणचे आमदार करत आहेत. या पार्श्वभूमीवर माझी समस्त मराठा समाजाच्या मुलांना मग ते कोणत्याही संघटनेत असोत अथवा पक्षात असोत त्यांना माझी विनंती आहे की संजय बेळगावकर यांच्यासारख्या लोकांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष देऊ नये. पुन्हा एकदा माझे संजय बेळगावकर यांना सांगणे आहे की खरोखर तुम्ही जर मराठी प्रेमी असाल तर खादरवाडीच्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही काहीही का बोलला नाही? पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या तेथील एखाद्या शेतकऱ्याची जमीन महिन्याभरात आमदाराच्या भावाच्या नावावर होते. तेव्हा मराठा समाजाचे नेते म्हणून संजय बेळगावकर यांनी कधी दक्षिणचे आमदारांना कधी जाब विचारलेला नाही. मराठी भाषिक युवकांवर पोलिसांकडून जेंव्हा गुन्हे दाखल केले जातात. तेंव्हा संजय बेळगावकर किंवा दक्षिणचे आमदार कधीही मराठा समाजाच्या युवकांचे हितरक्षण करत नाहीत. राजकीय पक्षांकडून मराठा समाजाला कामात गुंतवून वापरून घेतला जात आहे. तेंव्हा मराठा समाजाने आता शहाणे झाले पाहिजे.
दुसरी गोष्ट येळ्ळूर सारख्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर होऊनही अद्यापही ती व्यवस्थित कार्यान्वित झालेली नाही. या संदर्भातही संजय बेळगावकर यांनी आमदारांना जाब विचारलेला नाही किंवा येळ्ळूर मधील मराठी बांधवांना कधी भेटावयास गेलेले नाहीत असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगून एकंदरच संजय बेळगावकर यांना मराठा समाजाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही असे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले.
दरम्यान, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी एका व्हिडिओद्वारे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे बुडामध्ये भ्रष्टाचार झाला असं सारखं म्हणत असतात. तसेच त्याची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले आहेत. त्या चौकशीचे मी स्वागत करतो. तथापि मी मराठा समाजाचा आहे म्हणून ही चौकशी केली जाणार असे जे म्हंटले जात आहे त्याला माझा विरोध आहे. बेळगावच्या माननीय महापौर देखील आमच्या मराठा समाजाच्या आहेत. सध्या त्यांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा घाटही त्यांनी रचला आहे. याचा मी निषेध करतो. मराठा समाजाला लक्ष करण्याच्या या दोन्ही गोष्टींचा मराठा समाजाने गांभीर्याने विचार केला, पाहिजे असे आवाहन बेळगावकर यांनी केले आहे